
प्रेमप्रकरणांमधून घडणाऱ्या अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना अक्षरशः थरकाप उडवणाऱ्या असतात. त्या घटनांबद्दल नुसतं ऐकलं, तरी घाबरायला होतं, प्रत्यक्षात ते कृत्य करायला माणसं धजावत कशी असतील, ही आश्चर्याचीच गोष्ट आहे.
गुजरात राज्यातल्या सुरतमधल्या वराछामध्ये प्रेमी युगलाने आत्महत्या करायचं ठरवलं. म्हणून दोघंही इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर गेले; प्रत्यक्षात मात्र वरून उडी मारताना प्रियकराचा विचार बदलला आणि अल्पवयीन प्रेयसीने एकटीनेच उडी मारली. तिला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी जे सत्य सांगितलं, त्यामुळे तर या प्रकरणाला आणखी वेगळं वळण मिळालं. ती तरुणी सहा महिन्यांची गर्भवती असल्याचं निष्पन्न झालं. या सगळ्या प्रकारामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
या प्रकरणातली मुलगी 17 वर्षांची म्हणजे अल्पवयीन असून, तिच्या कथित प्रियकराचं नाव सोहम गोहिल असं आहे. पीडितेच्या बहिणीने पोलिसांत दाखल केलेल्या एफआयआरनुसार, पीडिता आणि सोहम या दोघांची वर्षभरापूर्वी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पहिली भेट झाली. दोघंही जण सुरतमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम करत होते. त्यांच्यात मैत्री झाल्यानंतर सोहमने पीडितेला आपल्या घरी बोलावलं. तसंच, तिला लग्नाचं वचन दिलं आणि तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
काही दिवसांपूर्वीच पीडितेला कळलं, की सोहमने आपल्याला लग्नाचं वचन दिलं आहे; मात्र प्रत्यक्षात त्याचं अन्य कोणाशी तरी लग्न ठरलं असून, साखरपुडाही झाला आहे. त्यामुळे तिने त्याला यासाठी विरोध केला. पीडिता आपल्या बहिणीसोबत राहते. तिथे गेल्या शुक्रवारी सोहम पीडितेला भेटायला गेला. तेव्हा त्या दोघांमध्ये या विषयावरून खूप वादावादी झाली.
सहा महिन्यांची गर्भवती
सकाळी साडेदहाच्या सुमारास दोघंही शेजारच्या बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावर गेले. जाताना पीडितेने आपल्या बहिणीच्या घराचा दरवाजा बंद केला; मात्र बहिणीने शेजाऱ्यांना बोलावलं आणि त्यांनी दरवाजा उघडला. मात्र बहीण तिथे पोहोचेपर्यंत पीडितेने इमारतीवरून उडी मारली होती आणि सोहम गोहिल जिन्याने उतरून खाली आला. पीडितेच्या पाठीला आणि चेहऱ्यावर जखमा झाल्या. तेथील नागरिकांनी तातडीने अँब्युलन्स बोलावली आणि डॉक्टरांकडे नेलं. उपचार करताना डॉक्टरांच्या असं लक्षात आलं, की ती सहा महिन्यांची गर्भवती आहे.
तासभर बोलले मग आत्महत्या करायचा ठरवलं
वराछा पोलीस इन्स्पेक्टर आर. बी. गोजिया यांनी सांगितलं, की ‘दोघांनी एक तासभर बोलून आत्महत्या करायचा ठरवलं. म्हणून ते दोघं इमारतीवर गेले आणि एकमेकांचे हात पकडले; मात्र उडी मारण्याची वेळ आली, तेव्हा सोहम गोहिलने पीडितेचा हात सोडला. त्यामुळे तिने एकटीनेच उडी मारली. त्याला पकडण्यासाठी आम्ही टीम्स तयार केल्या आहेत.’
पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली, तसंच पीडितेचा जबाबही नोंदवला. त्याआधारे रविवारी एफआयआर नोंदवण्यात आला. आरोपी सोहम गोहिल याच्याविरुद्ध मुलीवर बलात्कार करण्याचा, तिला गर्भवती करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्यायसंहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.