
पुणे येथील रहिवाशी असणाऱ्या भाऊ आणि बहिणीचा दुर्दैवी अंत झाला आहे. दोघंही एका हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळले आहेत. शुक्रवारी १७ जानेवारीला दोघंही एका हॉटेलमध्ये मुक्कामी थांबले होते.
एक दिवस हॉटेलमध्ये घालवल्यानंतर दुसऱ्या दिवशी हॉटेलमध्ये दोघांचा मृतदेह आढळला आहे. दोघंही गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडले. रविवारी जेव्हा हॉटेल कर्मचाऱ्यांनी रुमचा दरवाजा ठोठावला तेव्हा आतून कसलाच प्रतिसाद मिळाला नाही.
संशय आल्याने कर्मचाऱ्यांनी तातडीनं घटनेची माहिती पोलिसांना दिली. तेव्हा दोघंही मृतावस्थेत आढळून आले. यावेळी रुममध्ये सुसाइड नोट देखील आढळली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ही आत्महत्या आहे की काही घातपात? याचा तपास पोलीस करत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार ही आत्महत्येची घटना असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
डाकताई कोन्तिबा बामन (४८) आणि मुक्ता कोन्तिबा बामन (४५) असं मृत पावलेल्या बहीण भावांचं नाव आहे. दोघंही पुण्यातील रहिवासी असून अलीकडेच ते केरळला गेले होते. दोघेही १७ जानेवारी रोजी तिरुवनंतपुरमच्या थंपनूर येथील एका हॉटेलमध्ये थांबले होते. रविवारी सकाळी हॉटेलच्या रुममधून काहीच हालचाल होत नव्हती. त्यामुळे हॉटेल कर्मचाऱ्यांनी अनेकदा दार ठोठावलं, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. कर्मचाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी तातडीनं या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुषाचा मृतदेह फासावर लटकलेल्या स्थितीत आढळून आला. तर महिलेचा मृतदेह बिछान्यावर पडलेला होता. हॉटेलच्या खोलीतून एक सुसाइड नोट सापडली असून त्यात ‘आमच्याकडे ना घर आहे, ना नोकरी. आमचा मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करू नका’ अशी विनंती करण्यात आली होती.
भाऊने आधी बहिणीची हत्या केली आणि नंतर आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत महिला दिव्यांग होती आणि हे दोघे उपचारासाठी तिरुवनंतपुरमला आले असावेत. घटनास्थळी मिळालेल्या सुसाइड नोटच्या आधारे पोलीस तपास करत आहेत. याबाबतचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल, असंही पोलिसांनी सांगितलं.