
सरपंच हत्याकांड प्रकरणी वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल केला जावा, अशी मागणी सातत्याने होते आहे. अशातच कोर्टात सुरु असलेल्या युक्तिवादादरम्यान कराड यांच्या वकिलांनी महत्त्वपूर्ण युक्तिवाद केला.
वाल्मिक कराडवर हत्येा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असं कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी केला. मकोका लागल्यानंतर तपास पथकानं वाल्मिक कराडला कोर्टासमोर हजर केलं. यावेळी कोर्टासमोर युक्तिवाद करतेवेळी ठोंबरे यांनी कराड यांच्या बाजुने केलेला युक्तिवाद महत्त्वाचा मानला जातो आहे.
कराडची कोठडी वाढणार..?
वाल्मिक कराडची कोठडी वाढवून मिळावी, यासाठी तपास यंत्रणांचे प्रयत्न सुरु आहे. वाल्मिक कराडसह सरपंच हत्याकांडप्रकरणातील आरोपी यांचे संबंध आहेत, हे सिद्ध करण्यासाठी पोलिसांना आणखी तपास करायचा आहे. याआधी पोलिसांनी फोन कॉल, आवाजाचे नमुने घेतले असून त्याचा सखोल तपासही सुरु आहे. दरम्यान, या खंडणी प्रकरणाचा हत्याकांड प्रकरणाशी नेमका संबंध कसा आहे, हे पोलिसांना सिद्ध करुन दाखवण्याचं आव्हान असणार आहे. त्यासाठी पोलिसांना कराडची कोठडी वाढवून मिळण्याची गरज असल्याचं सांगितलं जातंय.
कोर्टाचा प्रश्न
दरम्यान सुनावणीवेळी कोर्टानेही तपास अधिकाऱ्यांना प्रश्न केला. फक्त फोन कॉलच्या आधारवरच वाल्मिक कराडला आरोपी बनवलं का? अशी विचारणा कोर्टाने तपास अधिकाऱ्यांना केली. त्याआधी वाल्मिक कराडच्या वकिलांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे युक्तिवाद करत कोर्टासमोर एक महत्त्वाची बाब मांडली. कोणत्याही आरोपीनं कराडचं नाव घेतलेलं नाही, असं वाल्मिक कराडच्या वकिलांना कोर्टाला सांगितलं.
पोलिसांसमोर पेच..
बीड पोलीस, सीआयडी, एसआयटी अशा तपास यंत्रणांसमोर वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले, विष्णू चाटे, सुधीर सांगळे यांचा एकमेकांशी नेमका संबंध काय आहे, हे देखील सिद्ध करावं लागणार आहे. त्यासोबतच वाल्मिक कराडच्या मालमत्तेचा संबंध कुणाकुणाशी आहे, हे तपासण्यासोबत विष्णू चाटे यांचा गहाळ झालेला फोन शोधण्याचं आव्हानही असणार आहे. भारतासोबत विदेशात वाल्मिकची संपत्ती आहे की नाही, या अनुशंगानेही आपल्याला पुढील तपास करायचा आहे, असंही तपास यंत्रणांनी कोर्टाला सांगितलं.