या’ फळांचे सेवन केल्यास वाढू शकतो Diabetes चा धोका, जाणून घ्या फळे खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत

Diabetes: भारतासह जगभरात सगळीकडे मधुमेह, उच्च रक्तदाब, हार्ट अटॅक यांसारख्या गंभीर आजारांच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
आहारात होणारे बदल, कमी पाण्याचे सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव, पोषक घटकांची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर अंगाला खाज येणे, वारंवार लघवीला होणे, चक्कर येणे इत्यादी वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. पण सुरुवातीच्या दिवसांमध्ये या लक्षणांकडे सुद्धा दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे.
आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. ताजी फळे खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे इत्यादी आवश्यक घटक मिळतात. संतुलित आहारात फळांचा सुद्धा समावेश केला जातो. पण काही फळांमध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढवतात आणि शरीराला धोका निर्माण करतात. त्यामुळे फळांचे सेवन करताना योग्य ती काळजी घेणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या फळांच्या सेवनामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते आणि फळे खाण्याची योग्य पद्धत.
आंबा:
वर्षातून एकदाच बाजारात मोठ्या प्रमाणावर आंबे उपलब्ध होतात. फळांचा राजा म्हणून ओळख असलेला आंबा केवळ भारतातच नाहीतर जगभरात फेमस आहे. त्यामुळे आवडीने आंब्याचे सेवन केले जाते. आंब्यामध्ये नैसर्गिक साखर आणि कार्बोहायड्रेट्स खूप जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे एकाच वेळी खूप जास्त प्रमाणात आंबे खाल्ल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते. मधुमेहाने त्रस्त असलेल्या लोकांनी आंबा कापून खावा. मिल्कशेक किंवा रस बनवून प्यायल्यास रक्तात साखरेचे प्रमाण लगेच वाढते.
केळी:
केळीमध्ये पोटॅशियम, फायबर आणि इतर पोषक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. वजन वाढवण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी केळी खाण्याचा सल्ला दिला जातो. पण जेवढी मोठी केळी तितकेच त्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांनी लहान आकाराची केळी खावी. केळ्यांचे सेवन सकाळच्या नाश्त्यात किंवा दुपारच्या वेळी करावे.
खजूर:
नियमित एक किंवा दोन खजूर खाण्याचा सल्ला दिला जातो. खजूर हा सुकामेव्याचा प्रकार आहे. यामध्ये नैसर्गिक साखर आणि कार्बोहायड्रेट्स असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे एका वेळी एक किंवा दोनच खजूर खावेत. मधुमेहाने त्रस्त असलेल्या रुग्णांनी फळाचे सेवन करताना योग्य ती काळजी घ्यावी अन्यथा आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात.



