Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

ऑनलाईन गेमिंग रोखण्यासाठी यंत्रणा पालकमंत्री नीतेश राणे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून विशेष पथकासाठी प्रयत्न

ऑनलाईन गेमिंगचे जिल्ह्यातील वाढते प्रस्थ नियंत्रणात आणण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्यात येईल. यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून विशेष पथकासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही पालकमंत्री नीतेश राणे यांनी आज येथे दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री राणे यांच्या अध्यक्षतेखाली सायबर सेक्युरिटी आणि ऑनलाईन गेमिंगच्या वाढत्या प्रभावाबाबत बैठक झाली.

सिंधुदुर्ग जिल्हा गोव्याच्या सीमेलगत असल्याने तसेच जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता सायबर गुन्हे आणि ऑनलाईन गेमिंगशी संबंधित गैरप्रकारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. काही आठवड्यांपूर्वी जिल्ह्यात ऑनलाईन गेमिंगच्या आहारी गेलेल्या तरुणाने आत्महत्या केली होती. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राणे यांनी यावेळी चिंता व्यक्त केली.

ते म्हणाले, ‘पोलिसांच्या कारवाईमुळे मटका आणि जुगार अड्डे बंद झाले आहेत; मात्र अशा गैरप्रकारांचे स्वरूप आता ऑनलाईन माध्यमांकडे वळत असल्याचे निदर्शनास येत आहे. विशेषतः तरुण वर्ग ऑनलाईन मटका, गेमिंग आणि तत्सम डिजिटल प्लॅटफॉर्मच्या संपर्कात येत असल्याने त्यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्याची आहे. ऑनलाईन गेमिंगमुळे तरुणांमध्ये आर्थिक नुकसान, मानसिक ताण आणि नैराश्यासारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असून, काही प्रकरणांमध्ये त्याचे गंभीर परिणामही समोर येत आहेत.

त्यामुळे या प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर आणि अपर पोलिस अधीक्षक यांच्या समन्वयाने जिल्ह्यात स्वतंत्र आणि सक्षम यंत्रणा उभारण्याचे नियोजन आहे.’ ते म्हणाले, ‘सायबर गुन्ह्यांचे प्रतिबंध, शोध आणि तपास अधिक प्रभावी करण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत.

जिल्ह्याची विशेष परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून जिल्ह्याला विशेष पथक अथवा अतिरिक्त मनुष्यबळ आणि तांत्रिक क्षमता उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.’

“तरुण पिढी सायबर गुन्हेगारीच्या जाळ्यात किंवा ऑनलाईन जुगार व गेमिंगच्या आहारी जाऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांसोबतच जनजागृती करण्यात येणार आहे. सायबर गुन्हे सिद्धता वाढवून दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत. याबाबत प्रशासनाकडून माहिती घेण्यात आली असून, आगामी काळात या उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम दिसून येतील.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *