कोरड्या दोड्डनाला तलावात गणरायाची आरती दुष्काळ जाहीर करण्याची मागणी : तम्मनगौडा रविपाटील यांचे अनोखे आंदोलन

तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. पूर्व भागातील अनेक गावांत पिण्याच्या पाण्यासह शेती व पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक तलाव कोरडे पडले असतानाच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माजी सभापती तम्मनगौडा रविपाटील यांनी उमदीसह सीमाभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या कोरड्या दोड्डनाला तलावात गणरायाची आरती करून लक्ष वेधले. तालुक्यातील अनेक गावांमध्ये टंचाईची स्थिती आहे. तलाव, बंधारे व पाणवठे कोरडे पडल्याने नागरिक, पशुपालक शेतकऱ्यांसमोर पाणी उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हैसाळ सिंचन योजना असूनही योग्य नियोजनाअभावी तिच्या पाण्याचा शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळत नसल्याची तक्रार आहे. गणेशोत्सवात मूर्ती विसर्जनासाठीही पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे कोरड्या तलावातच गणरायाची आरती करून ‘जत तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा,’ अशी मागणी करण्यात आली.
रविपाटील म्हणाले, ”जत तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. विशेषतः पूर्वभागातील नागरिकांना पिण्याचे, शेतकऱ्यांना शेतीचे पाणी आणि पशुपालकांना जनावरांसाठी पाण्याची अडचण भेडसावत आहे. अनेक तलाव कोरडे पडलेत. म्हैसाळ योजनेच्या पाण्याचे योग्य नियोजन करून कोरडे तलाव भरावेत.”
”शासनाने जत तालुका तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करून दुष्काळी भागासाठीच्या उपाययोजना लागू कराव्यात. पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी व चारा उपलब्ध करून देण्याबरोबरच म्हैसाळ योजनेतून तलाव भरण्याची कार्यवाही करावी,” अशी मागणी त्यांनी केली.
कोरड्या तलावात झालेली गणरायाची आरती ही जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधणारी ठरली. सरकारने परिस्थितीची पाहणी करून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आहे. पूर्व भागातील शेतकरी उपस्थित होते.



