‘आणखी काही कामं नष्ट होणार’, उद्योगपती हर्ष गोयंका यांनी मेहंदी काढणाऱ्या मशीनचा व्हिडीओ शेअर करत दिला इशारा

अब्जाधीश उद्योगपती हर्ष गोयंका हे त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर अनेक मीम्स किंवा व्हिडीओ शेअर करत असतात. कधी आर्थिक बाबी तर कधी व्हायरल गोष्टींवर त्यांच्याकडून भाष्य केले जाते.
आनंद महिंद्रा आणि हर्ष गोयंका यांच्या प्रत्येक पोस्टची दखल घेतली जाते. समाज आणि त्यातील समस्यांबाबत सजग असलेले उद्योगपती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. गोयंका यांनी नुकताच शेअर केलेला व्हिडीओही असाच चर्चेत आहे.
गोयंका यांनी हातावर यंत्राच्या साहाय्याने मेहंदी काढली जात असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. तंत्रज्ञान जसे जसे प्रगत होत आहे, तसे तसे काही पारंपरिक कामं कालबाह्य होत गेली. आता मेहंदी काढण्यासारखे कामही कालबाह्य होणार का? हा प्रश्न त्यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून मांडला आहे.
व्हिडीओमध्ये काय दिसले?
हर्ष गोयंका यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला मेहंदी काढणाऱ्या यंत्राखाली हात धरते. त्यानंतर संबंधित यंत्र अतिशय बारीक नक्षीकाम असलेली मेहंदी काढते. एरवी एखादा मेहंदी कलाकार मेहनतीने नक्षीकाम करतो, ते मशीन अवघ्या काही मिनिटात करत असल्याचे दिसत आहे.
आणखी काही कामे जाणार’
हा व्हिडीओ शेअर करताना हर्ष गोयंका यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आणखी काही कामे जाणार’. गोयंका यांच्या या पोस्टनंतर अर्थातच त्याची चर्चा सुरू झाली. तंत्रज्ञानामुळे जे काम मनुष्याकडून केले जात होते, ते कसे नष्ट होत आहे, यावर अनेकांनी चिंता व्यक्त केली.
नक्षीदार मेहंदी काढणे हे कौशल्याचे काम आहे. मेहंदी कलाकार याचे शिक्षण घेतात किंवा अनेक वर्षांच्या कामातून मेहंदी काढण्याचे कौशल्य प्राप्त करत असतात. भारतात लग्न समारंभ, सण किंवा खास क्षणांसाठी मेहंदी काढली जाते. आता यासाठी यंत्राचा वापर होऊ लागल्यास मेहंदी कलाकारांच्या कामावर परिणाम होऊ शकतो. स्वयंचलित यंत्रामुळे यापूर्वीही अनेक कारखाने आणि उद्योग लयास गेले आहेत.
हर्ष गोयंका यांच्या पोस्टमुळे ऑटोमेशन आणि रोजगाराबद्दल चर्चा सुरू झाली आहे. या विषयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेक युजर्सनी म्हटले की, असे यंत्र आले तरी पारंपरिक मेहंदी कलाकारांना काळजी करण्याचे फारसे कारण नाही. दुसऱ्या एका युजर्सने लिहिले की, सुईसारख्या दिसणाऱ्या त्या यंत्राखाली हात ठेवण्याचे धाडस महिला करणार नाहीत. विशेषतः लग्न किंवा इतर सणापूर्वी असे करणे धोक्याचे वाटू शकते. पण ही मशीन रांगोळी नक्कीच काढू शकते.
आणखी एका युजर्सने म्हटले की, हाताने काढलेल्या मनमोहक नक्षीकामाची जागा यंत्राकडून घेतली जाऊ शकत नाही. हस्तकलेतील परिपूर्णता रोबोटिक डिझाइन घेऊ शकत नाही. मानवी स्पर्श आणि हस्तकलेतील बारकाव्यांमुळे आणखी चांगले काम होते.
तर काही युजर्सनी म्हटले की, यंत्रामुळे आहे ते काम जाणार नाही, उलट आणखी नवीन संधी निर्माण होऊ शकतात.



