
धुळे : दोंडाईचा शहराला पर्यटनाच्या नकाशावर ठळक स्थान मिळवून देण्यासाठी पितृछाया ऑक्सिजन पार्क, अमरावती नदीवरील के.टी. वेअर आणि परिसरातील विविध सुविधा विकसित करण्यात येत असून आगामी काळात हा परिसर उत्तर महाराष्ट्रातील आकर्षक पर्यटन व पिकनिक डेस्टिनेशन म्हणून उदयास येईल, असा विश्वास राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.
सहकार महर्षी दादासाहेब रावल यांच्या जयंतीनिमित्त पितृछाया ऑक्सिजन पार्क येथे जिल्हा नियोजन समितीच्या ५० लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या भव्य प्रवेशद्वार, तीन पागोड्या आणि संरक्षक रेलिंगचे लोकार्पण पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी दोंडाईचाच्या पर्यटन विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.
१६ एकरवर ऑक्सिजन पार्क,अमरावती नदीवर बंधरा
वन विभागाच्या १६ एकर जागेवर विकसित करण्यात आलेल्या पितृछाया ऑक्सिजन पार्कमध्ये दोन वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या सुमारे ३० हजार वृक्षांचे यशस्वी संगोपन झाल्याने संपूर्ण परिसर हिरवाईने नटला आहे. नैसर्गिक सौंदर्य, दाट वृक्षराजी आणि शांत वातावरणामुळे नागरिकांसह पर्यटकांसाठी हे ठिकाण आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. पार्कमध्ये कुटुंबांसाठी बसण्याची व्यवस्था, पागोड्या, सुरक्षित रेलिंग आणि भव्य प्रवेशद्वार उभारल्याने पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी पार्कलगतच्या अमरावती नदीवर एक कोटी खर्चाचा कोल्हापूर बंधरा (के.टी. वेअर) उभारण्यात येत असून त्याचे काम सुरू झाले आहे.
तसेच परिसरात आणखी साठवण बंधारे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पांमुळे वर्षभर पाणीसाठा उपलब्ध राहणार असून नदीकाठचा परिसर अधिक नयनरम्य होईल. परिणामी, पितृछाया ऑक्सिजन पार्क आणि अमरावती नदी परिसर एकत्रितपणे दोंडाईचाचे नवीन पर्यटन आकर्षण म्हणून विकसित होणार आहे. परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी स्वच्छता, प्रकाशयोजना, पिण्याचे पाणी, वाहनतळ आणि पर्यटकांसाठी आवश्यक दिशादर्शक फलकांची सुविधाही टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन सुरक्षितता आणि देखभाल व्यवस्थेवर विशेष भर दिला जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि प्रशासन यांच्या सहभागातून या पर्यटनस्थळाचे संवर्धन करण्यात येणार आहे. पर्यटकांनी परिसरात स्वच्छता राखून पर्यावरणपूरक पर्यटनाला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले. येत्या काळात पितृछाया ऑक्सिजन पार्क परिसरात आणखी पर्यटनपूरक सुविधा विकसित करण्याची संधी निर्माण झाली आहे. पार्क, अमरावती नदी, के.टी. वेअर आणि प्रस्तावित साठवण बंधारे यांचा एकत्रित विकास झाल्यास दोंडाईचा शहराला पर्यावरणपूरक पर्यटनस्थळ म्हणून नवी ओळख मिळू शकते. स्थानिक नागरिकांसह जिल्ह्यातील आणि शेजारच्या राज्यांतील पर्यटकांना आकर्षित करण्याची क्षमता या परिसरात आहे. पर्यावरण संवर्धन, जलसंधारण आणि पर्यटन विकास यांचा समन्वय साधणाऱ्या या प्रकल्पांमुळे स्थानिक रोजगारालाही चालना मिळेल. भविष्यात शालेय सहली, कुटुंबीयांचे पिकनिक, सामाजिक कार्यक्रम आणि निसर्गप्रेमींसाठी हा परिसर पसंतीचे ठिकाण ठरेल. त्यामुळे दोंडाईचाच्या पर्यटन विकासाला नवी गती मिळणार असून शहराची स्वतंत्र पर्यटन ओळख निर्माण होण्यास मोठी मदत होणार आहे.



