शिवराज मोरे हल्ला प्रकरण: काँग्रेसचे शिष्टमंडळ पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या भेटल, निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी

नागपूर : युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर बुधवारी आंदोलना दरम्यान झालेल्या हल्ल्याची तातडीने निष्पक्ष आणि सखोल चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे केली.
बुधवारी आरएसएस कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चा दरम्यान शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेतली. या वेळी घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनाच्या वेळी घडलेला हा प्रकार गंभीर असून, त्यामागील नेमकी कारणे आणि सहभागी व्यक्तींची भूमिका तपासणे आवश्यक असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.
फडणवीसांना पत्र
या प्रकरणी वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र पाठविले आहे. हल्ल्याची तातडीने चौकशी करून संबंधितांविरुद्ध लागू कायद्यांनुसार गुन्हा दाखल करावा आणि पुराव्यांच्या आधारे दोषींना अटक करावी, अशी मागणी केली. घटनेत इतर व्यक्तींचा सहभाग, चिथावणी किंवा पूर्वनियोजन आढळल्यास त्यांच्यावरही कायद्यानुसार कारवाई करावी, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
इलेक्ट्रॉनिक पुरावे जतन करण्याची मागणी
हल्ल्याच्या तपासासाठी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओ, छायाचित्रे, मोबाइल रेकॉर्डिंग तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक पुरावे तातडीने जतन करून तपासात समाविष्ट करावेत, अशी मागणी काँग्रेसने केली. तसेच प्रत्यक्षदर्शी आणि संबंधित व्यक्तींचे जबाब कायदेशीर प्रक्रियेनुसार नोंदवावेत, असेही शिष्टमंडळाने पोलिसांना सांगितले. तपासाची दिशा आणि त्यातून समोर येणाऱ्या बाबींच्या आधारे संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी काँग्रेसची भूमिका आहे. तपासाची प्रगती आणि करण्यात आलेल्या कारवाईची माहिती तक्रारदार तसेच संबंधित पक्षाला नियमानुसार देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
आंदोलकांच्या सुरक्षेचा मुद्दा
शांततापूर्ण आंदोलन करणे हा नागरिकांना संविधानाने दिलेला लोकशाही अधिकार आहे. या अधिकाराचा वापर करणाऱ्या नागरिकांवर हल्ले होत असतील, तर ही बाब लोकशाहीसाठी गंभीर इशारा असल्याचे काँग्रेस शिष्टमंडळाने म्हटले. राज्यातील शांततापूर्ण आंदोलने आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली.



