Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

या’ रस्त्यावर ओशाळला मृत्यू! काँग्रेस खासदाराची मंत्री नितीन गडकरींकडे धाव; वर्ध्यातील रस्त्यांसाठी ८०० कोटींच्या निधीची मागणी

वर्धा : राजकारणात मतभेद असावे, मनभेद नाही. हे वाक्य सुभाषितवजा लोकप्रिय करणारे मंत्री म्हणजे नितिन गडकरी. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय सांभाळणारे गडकरी त्यांचे हे सुभाषित अंमलात आणतात काय ?

तर त्याचे होय असे उत्तर विरोधक पण देतात. हक्काने त्यांच्याकडे जात मदत मागणारे सर्वपक्षीय नेते आहेत, हे एव्हाना जगजाहीर. त्याचाच हा किस्सा. राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे खासदार अमर काळे हे मूळचे आर्वीकर माजी आमदार. त्यांना कधीकाळी भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण देणारे गडकरीच.

केंद्रीय रस्ते निधी

वर्धा लोकसभा मतदारसंघातील नागरिकांच्या दैनंदिन दळणवळणाचा मुख्य आधार असलेल्या आणि सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत पोहोचलेल्या तीन प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी केंद्रीय रस्ते निधी (CRF) अंतर्गत तातडीने ८०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी खासदार अमर काळे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

वर्धा मतदारसंघातील अनेक प्रमुख रस्त्यांची कामे यापूर्वी सीआरएफ निधीतून पूर्ण झाली असली तरी सध्या तीन महत्त्वाच्या मार्गांवर जागोजागी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. यामुळे साधी दुचाकी चालवणेही अत्यंत धोकादायक व जिकिरीचे झाले असून चारचाकी वाहनांच्या वाहतुकीवरही याचा गंभीर परिणाम होत आहे.अनेक अपघात झालेत, असे खा. काळे सांगतात.

निधीची मागणी

मार्गनिहाय – १. पुलगाव – विजयगोपाल – शिरपूर मार्ग: ४०० कोटी रुपये (हा मार्ग पुढे तुळजापूर-यवतमाळ मार्गाला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे).
२.वर्धा – वायफड – रसुलाबाद – सोरटा मार्ग: २०० कोटी रुपये (हा मार्ग वर्धा-आर्वी-पुलगाव मार्गाशी जोडला गेला आहे).
३.वर्धा – दिग्रस – मांडवा मार्ग: २०० कोटी रुपये (ग्रामीण भागाला प्रमुख मार्गांशी जोडणारा अत्यंत महत्त्वाचा रस्ता).

ग्रामीण जीवनवाहिनी धोक्यात

हे तिन्ही रस्ते केवळ दळणवळणाचे साधन नसून ग्रामीण भागातील आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि शेती व्यवसायासाठी शहराशी जोडणारी मुख्य ‘जीवनवाहिनी’ आहेत. दररोज हजारो शाळकरी मुले, रुग्ण, शेतकरी आणि व्यापारी या मार्गांवरून प्रवास करतात. मात्र, रस्त्यांच्या अत्यंत बिकट स्थितीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. याबाबत स्थानिक नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत असल्याने खासदार अमर काळे यांनी या समस्येची दखल घेत थेट केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा केला आहे.

खासदार काळे यांनी स्पष्ट केले की, या तिन्ही मार्गांचे वेळेत मजबुतीकरण आणि दुरुस्ती झाल्यास हजारो नागरिकांना खड्डेमुक्त व सुरक्षित प्रवास उपलब्ध होईल. ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासासाठी सक्षम व बळकट रस्ते व्यवस्था अत्यंत आवश्यक असून, संभाव्य अपघात टाळण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने विलंब न करता ८०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, असे त्यांनी नमूद केले आहे. खा. अमर काळे यांची ही गडकरीकडे पहिलीच मागणी नाही. ते दिल्लीत व नागपूरात विकास कामांसाठी गडकरी यांची भेट घेतात व गडकरी पण त्यांना नाराज करीत नाही, असे काळे समर्थक सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *