Navgan News



Add Space

धार्मिकनवगण विश्लेषण

बीड जावईबापूंसाठी बनवलेला सोन्याच्या अंगठीचा धोंडा थेट घरातील मांजरानेच केल फस्त,मांजराचा जीव गेला मग जावयाला मिळाली सोन्याची अंगठी

अधिक मास अर्थात धोंड्याचा महिना सुरू झाला की सासुरवाडीला जाणाऱ्या जावईबापूंची चांदी असते. लेक-जावयाचं सासुरवाडीला होणारं स्वागत, मानपान आणि आहेर चर्चेचा विषय असते. सासरच्या मंडळींकडून लाडक्या जावयासाठी गोडधोड जेवणाचा बेत आणि सोन्या-नाण्याचे आहेर दिले जातात.

मात्र बीड जिल्ह्यातील टाकरवण परिसराजवळील एका गावात जावईबापूंसाठी बनवलेला सोन्याच्या अंगठीचा धोंडा थेट घरातील मांजरानेच फस्त केल्याची अजब घटना समोर आली आहे. या अनोख्या प्रकारामुळे सासुरवाडीला गेलेल्या जावयाचा चांगलाच हिरमूड झाला.
नेमकी घटना काय घडली?

मिळालेल्या माहितीनुसार, अधिक मासानिमित्त सासूबाईंनी आपली लाडकी लेक आणि जावयाला ‘धोंडे जेवणासाठी’ घरी आमंत्रित केले होतं. जावईबापूंना खास सरप्राईज देण्यासाठी सासूबाईंनी ५ ग्रॅम सोन्याची अंगठी एका पिठाच्या धोंड्यात (धोंड्याच्या महिन्यात बनवला जाणारा विशेष पदार्थ) लपवून ठेवली होती. घरात सर्वजण पाहुणचारात आणि गप्पांमध्ये मग्न होते. नेमकं याच वेळी घरातील एका मांजराने तो सोन्याची अंगठी असलेला पिठाचा धोंडा खाल्ला.
मांजराला बांधून ठेवलं

मांजर धोंडा गिळत असल्याचे घरच्यांच्या लक्षात येताच एकच खळबळ उडाली. घरातील पुरुषांनी तातडीने धावपळ करून त्या मांजराला पकडले आणि एका जागी बांधून ठेवले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सासरची मंडळी पुरती गोंधळली. अखेर जावईबापूंना जेवणाचे ताट वाढले गेले, पण सोन्याची अंगठी गायब असल्याने काय करावे सुचेना. शेवटी जावयाला सर्व सत्य परिस्थिती सांगण्यात आली. “अंगठी नंतर देऊ,” असे सांगून कपड्यांचा आहेर करत लेक-जावयाची तात्पुरती बोळवण करण्यात आली.
४ दिवस मांजराला बांधून ठेवलं

जावई गेल्यावर मांजराच्या विष्ठेद्वारे सोन्याची अंगठी बाहेर पडेल, या आशेने घरच्यांनी मांजराला चार दिवस बांधून ठेवले आणि त्यावर बारीक लक्ष ठेवले; मात्र काहीच उपयोग झाला नाही. शेवटी हताश होऊन घरच्यांनी मांजराला पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी मांजराला उलटी होण्याचे औषध दिले.

परंतु, दुर्दैवाने उपचारादरम्यान त्या मांजराचा मृत्यू झाला. मांजर दगावल्याने हळहळ व्यक्त झाली, तरी पोटात अडकलेली मौल्यवान अंगठी काढणे गरजेचे होते. अखेर मृत मांजराच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि डॉक्टरांनी तिच्या पोटातून ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी बाहेर काढली. मांजराचा जीव गेल्यानंतरच जावयाला अंगठी मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *