
पहाडी भागांमधील सीमांचे शत्रूच्या अतिक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी भारताने ‘ए. एम. नाईक इंजिनिअरींग काँप्लेक्स’ मध्ये एका सामर्ध्यवान रणगाड्याची निर्मिती केली आहे.
भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रातले हे एक महत्वाचे पाऊल आहे. या रणगाड्याची निर्मिती केवळ 19 महिन्यांमध्ये करण्यात आली आहे. हा रणगाडा कमी वजनाचा असल्याने तो हिमालयाच्या पर्वतीय भागातही वेगाने हालचाली करु शकतो. या रणगाड्यावरचा शस्त्रसंभारही अत्यंत आधुनिक आणि भारताच्या आवश्यकतांचा विचार करुन साकारलेला आहे.
या रणगाड्याचा उपयोग भारताला चीनच्या विरोधात अत्यंत प्रभावीपणे करता येणार आहे. चीनकडे डोंगराळ आणि हिमाच्छादीत क्षेत्रांमध्ये कार्यरत राहू शकतील, असे ‘टाईप 15’ जातीचे रणगाडे आहेत. या रणगाड्यांशी भारताला लडाख येथील चीनशी झालेल्या सीमासंघर्षात दोन हात करावे लागले होते. हा संघर्ष चार वर्षे चालला होता. त्यानंतर तोडगा निघून आता शांततेचे वातावरण आहे. तथापि, भविष्यात भारताला पुन्हा असा संघर्ष चीनशी करावा लागला, तर हा रणगाडा भारताचे मोठे बळ ठरणार आहे, असे अनेक संरक्षण तज्ञांनी मत व्यक्त केले.
अनेक वैशिष्ट्यांनी युक्त
या रणगाड्याची अनेक महत्वाची वैशिष्ट्यो आहेत. याचे वजन केवळ 25 टन आहे. त्याची रचना अतिथंड हवामानाही कार्यरत राहील अशी करण्यात आली आहे. हा रणगाडा वजनाला कमी असला, तरी बळकटपणासंदर्भात तो अवजड रणगाड्यांपेक्षाही सक्षम आहे. या रणगाड्याचे नामकरण भारताचे पराक्रम सैनिकी अधिकारी डोग्रा रेजिमेंटचे जनरल झोरावर सिंग यांच्या नावावरुन केले आहे. झोरावर सिंग यांना ‘लडाखचा विजेता’ म्हणून ओळखले जात आहे.
आधुनिक रचना
या रणगाड्यावर 105 मिमी रायफल्ड गन बसविण्यात आलेली आहे. ही ऑटोलोडर पद्धतीची गन आहे. या गनचा उपयोग विशेषत: डोंगराळ भागात शत्रूच्या लक्ष्यांना अचूकपणे टिपण्यासाठी केला जाऊ शकतो. हा रणगाडा डोंगराळ भागाच्या उंचसखल प्रदेशांमधून सहजगत्या आणि वेगाने हालचाल करु शकतो. त्यावर कोणत्याही दिशेला वळविता येऊ शकेल अशा प्रकारची 7.62 मिमी मशिनगनही बसविण्यात आली आहे. तसेच 12.7 मिमी दूरनियंत्रित शस्त्रस्थानक आणि दुहेरी प्रक्षेपण करु शकतील असे क्षेपणास्त्र प्रक्षेपक बसविण्यात आले आहेत. या प्रक्षेपकांच्या माध्यमातून नाग एमके 2 क्षेपणास्त्रे डागता येणे शक्य आहे.
दणकट इंजिन
या रणगाड्यात 760 हॉर्स पॉवरचे कमिन्स इंजिन असल्याने तो बराच काळ वेगाने प्रवास करु शकतो. त्याचा वेगही सर्वसामान्य रणगाड्यापेक्षा बराच अधिक आहे. तो 70 किलोमीटर प्रतितास असा वेग गाठू शकतो. एका इंधन पुरवठ्यात तो 450 किलोमीटरचे अंतर पार करु शकतो. कितीही खडकाळ, उंचसखल आणि मार्ग नसलेल्या स्थानांवरही त्याची हालचाल तितक्याच वेगाने होते. त्यामुळे कोणत्याही दुर्गम स्थानी त्याचा उपयोग युद्धात करता येणे शक्य आहे. या रणगाड्याचे उत्पादन आता मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे. तसेच भविष्यकाळात त्यात अधिक सुधारणा करण्यात येणार असून त्याची मारक क्षमताही अधिक प्रमाणात वाढविता येणे शक्य आहे, अशी माहिती देण्यात आली.
टिकावूपणात आघाडीवर
हा रणगाडा जागतिक गुणवत्तेचा आहे, असे अनेक तज्ञांचे मत आहे. तो हलका असला तरी दणकट आणि टिकावू आहे. दुर्गम युद्धभूमीवर तो भारतीय सैन्याचा मोठा आधार म्हणून सिद्ध होईल. संरक्षण साधनसामग्री निर्मिती क्षेत्रात भारताला ‘आत्मनिर्भर’ करण्यात तो महत्वाची भूमिका निश्चित साकारणार आहे.
भारताच्या भात्यात आणखी एक अस्त्र
ड झोरावर रणगाडा डोंगराळ भागासाठी अत्यंत सक्षम, मारकक्षमता श्रेष्ठ
ड अत्याधुनिक शस्त्रसंभाराने युक्त, हलका असूनही वेगवान आणि दणकट
ड नाग क्षेपणास्त्रे डागण्यास सक्षम, मशिनगन्स आणि आधुनिक तोफयुक्त
ड वजत 25 टन, अतिथंड हवामानाही कार्यरत राहण्याची विशेष क्षमता



