‘बाबाने आईला मारलं…’ चिमुकल्यांचा आक्रोश; कन्नड तालुक्यातील कळंकी घाटात पतीने आवळला पत्नीचा गळा

कन्नड : तालुक्यातील कळंकी येथील ठाकरवाडी येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या एका साथीदाराच्या मदतीने पत्नीचा दोरीने गळा आवळून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता.३) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. कांताबाई दगडू मधे (वय ३३) असे मृत महिलेचे नाव आहे. आईचा डोळ्यांदेखत झालेला हा क्रूर अंत पाहून घाबरलेल्या चिमुकल्यांनी गावात धाव घेत आपबिती सांगितली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कळंकी येथील ठाकरवाडी येथे दगडू मधे हा आपली पत्नी कांताबाई व चार मुलांसह वास्तव्यास होता. बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास दगडूने पत्नीला ‘मामाच्या गावाला जायचे आहे’ असे सांगितले. त्यानुसार दोघेही आपल्या दोन लहान मुलांसह दुचाकीवरून गुजरदरीकडे जाण्यास निघाले. मात्र, कळंकी घाटातील दाट जंगलात पोहोचताच दगडूने दुचाकी थांबवली.
तिथे पूर्व नियोजित कटानुसार दगडू आणि त्याच्या एका साथीदाराने सोबत आणलेल्या दोरीने कांताबाईचा गळा आवळला. यात श्वास गुदमरून कांताबाईचा जागीच मृत्यू झाला. विलास कडुबा मेंगाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दगडु अशोक मधे (४०) यांच्या विरुद्ध कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण गिते करत आहे.
चिमुकल्यांनी फोडला टाहो –
बापाने आईचा गळा आवळल्याचे पाहून दुचाकीवर सोबत असलेल्या दोन लहान मुलांनी भीतीपोटी घटनास्थळावरून थेट गावाच्या दिशेने पळ काढला. रडत-रडत गावात पोहोचलेल्या या चिमुकल्यांनी, “बाबाने आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका दाढीवाल्या माणसाने आईला मारले,” अशी काळजाचा थरकाप उडवणारी माहिती ग्रामस्थांना दिली. मुलांचा हा आक्रोश ऐकून गावकरी सुन्न झाले.
…आणि आरोपी स्वतःच पोलीस ठाण्यात दाखल!
पत्नीचा जंगलात खून केल्यानंतर आरोपी पती दगडू मधे याने थेट कन्नड ग्रामीण पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यात हजर झाला. तो ठाण्यात आला असता त्याच्या चेहऱ्यावर ना भीती होती, ना पश्चात्ताप. त्याचे हे निर्दयी वर्तन पाहून पोलीसही चक्रावून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कळंकी घाटातील घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला असून, आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत.
तीन दिवसांपूर्वीच झाले होते ‘धोंड्याचे जेवण’
मृत कांताबाई यांच्या माहेरच्या लोकांनी अत्यंत सुन्न करणारी माहिती दिली. अवघ्या तीन दिवसांपूर्वीच दगडू आणि कांताबाई हे आपल्या चार मुलांना सोबत घेऊन चाळीसगाव तालुक्यातील गुजरदरी येथे अधिक महिन्यानिमित्त ‘धोंड्याचे जेवण’ (धोंडा पुजणे) करण्यासाठी गेले होते. तिथे सर्व काही आलबेल होते, अत्यंत आनंदात हा कार्यक्रम पार पडला. दगडू पुढे जाऊन असे काही भयंकर पाऊल उचलेल आणि चार मुलांना पोरके करेल, याची पुसटशी कल्पनाही कांताबाईच्या माहेरच्यांना नव्हती. चिमुकल्यांच्या डोक्यावरील आईचे छत्र हरपल्याने परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.



