ताज्या बातम्या

पैशासाठी वृध्देला तिच्या झोपडीसह जाळून मारले


दहिवडी | माण तालुक्यातील जाशी येथे पैशासाठी वृध्देला तिच्या झोपडीसह जाळून मारल्याची घटना उघडकीस आलेली आहे. या परिसरात अजूबाजूला कोणीच राहत नसल्याने हा प्रकार उशिरा समजला आहे घटनेनंतर दोन ते तीन दिवसानंतर भेटण्यास आलेल्या भाच्यास झोपडीसह वृध्द महिला जळून खाक झाल्याचे दिसून आले. तेव्हा त्याने दहिवडी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून एका युवकास अटक करण्यात आली असून त्याने गुन्ह्याची कबुली पोलिासाजवळ दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जाशी येथे झोपडीसह एका वृद्धेला जाळून मारल्याची खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून संशयिताला अटक केली. त्याने पैशासाठी हा प्रकार केल्याची कबुली पोलिसांजवळ दिली. श्रीमती सीताबाई जयसिंग गलांडे (वय- 72) असे त्या वृद्धेचे नाव आहे. तर नाना दिगंबर गलांडे (वय- 20, रा. जाशी, ता. माण), असे संशयिताचे नाव आहे. जाशी येथील सीताबाई गलांडे ही वृध्दा पतीच्या मृत्यूनंतर एकट्याच घरी राहत होत्या. त्यांना मुलबाळ नसल्याने त्यांच्या घरी कोणीच नसायचे. त्यांच्या शेजारी राहणारा नाना गलांडे हा त्यांना पैशासाठी वारंवार त्रास देत होता.

दि. 5 जानेवारी रोजी रात्री नाना गलांडेने वृध्देची झोपडी पेटवून दिली आहे. जवळपास कोणीच नसल्याने या घटनेची कोणालाच चाहूल लागली नाही. दोन दिवसानंतर वृद्धेचा भाचा तेथे आला असता त्यांना सीताबाई राहत असलेली झोपडी जळाल्याचे दिसले. त्यामध्ये सीताबाई याही जळून मृत झाल्याचे दिसले. त्यानंतर नातेवाईक उत्तम हरिबा चोरमले यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीमध्ये पैशासाठी नाना गलांडे त्रास देत होता. त्यामुळे त्याच्यावर संशय व्यक्‍त केला. त्यानुसार गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी पंचनामा केल्यावर दहिवडी पोलिसांनी संशयिताला अटक केली. संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला दहिवडी न्यायालयाने दि. 13 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तपास सपोनि संतोष तासगावकर करीत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *