पुणे – शहरात नव्या करोना बाधितांच्या संख्येने रविवारी उच्चांक गाठला. यात दिवसात 4 हजार 029 बाधितांची नोंद झाली आहे. मार्च-2021 मध्ये शेवटच्या आठवड्यात बाधितांच्या संख्येने चार हजार संख्या ओलांडली होती करोना बाधितांच्या संख्येने या वर्षातील रेकॉर्डब्रेक केले असून, 10 महिन्यानंतर पुन्हा एकदा बाधितांची संख्या वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या 15 दिवसांपासून बाधितांची संख्या वाढत चालली आहे. गेल्या वर्षी 27 मार्च रोजी 3 हजार 463 बाधितांची नोंद झाली होती. त्यानंतर रुग्णसंख्या वेगाने वाढतच गेली. गेल्या 24 तासांत तीन बाधितांचा मृत्यू झाला असून, त्यातील दोन पुण्याबाहेरील आहेत. शहरातील एकाचा समावेश करून आजपर्यंत 9 हजार 127 जणांचा मृत्यू झाला आहे. बरे झालेल्यांची संख्याही पाच लाखांच्या पुढे गेली असून, ती 5 लाख 2 हजार 18 आहे. त्यात गेल्या 24 तासांत डिस्चार्ज दिलेल्या 688 जणांचा समावेश आहे, अशी माहिती महापालिका आरोग्य विभागाने दिली.
सक्रीय बाधितांची संख्या 14 हजारांवर
सक्रीय बाधितांची संख्या 14 हजार 890 झाली असून, त्यातील 5.48 टक्के बाधितांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यातील 16 जणांची प्रकृती गंभीर, 23 जणांची स्थिर तर 134 जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे.
सन 2021 बाधितांची वाढलेली संख्या
महिना बाधित संख्या
27 मार्च 3,463
28 मार्च 4,426
31 मार्च 4,458
01 एप्रिल 4,103
03 एप्रिल 5,720
पुणे महापालिका हद्दीत 14 हजार 890 सक्रिय रुग्णांपैकी 5.48 टक्के बाधित रुग्णालयात दाखल आहेत. शहरात रविवारी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असून, काळजी करण्याऐवजी काळजी घ्यावी, असे माझे पुणेकरांना आवाहन आहे.
– मुरलीधर मोहोळ, महापौर