Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

तळेगाव-चाकण- शिक्रापूर महामार्गावरील प्रवास आता वेगवान! सर्वाधिक कोंडीच्या पाच ठिकाणी ‘ॲक्शन प्लॅन’

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गावर सर्वाधिक कोंडी होणारी पाच ठिकाणे आहेत. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (पीडब्ल्यूडी) मोठ्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. या ठिकाणी महामार्गाची रुंदी १० वरून १५ मीटर करण्यात येणार आहे.

यामुळे या ठिकाणी वाहनांची गर्दी होऊन निर्माण होणारी कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. हे काम पुढील महिन्याच्या अखेरीस पूर्ण करण्याचे नियोजन असून, त्यानंतर तळेगाव ते चाकण वाहतुकीला गती मिळणार आहे.

तळेगाव-चाकण-शिक्रापूर हा ५४ किलोमीटरचा महामार्ग आहे. हा महामार्ग दुपदरी असून, तळेगाव आणि चाकण या औद्योगिक क्षेत्रातील वाहतुकीसाठी हा मुख्य मार्ग आहे. यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होते. त्यामुळे आधीच अरुंद असलेल्या या महामार्गावर कोंडी होते. या महामार्गाची दुरवस्था झाल्याने त्यांच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. विभागाकडून या महामार्गावरील खड्डे बुजविण्यासह विविध ठिकाणी खराब झालेला भाग दुरुस्त करण्यात आला आहे. याचबरोबर रस्त्याच्या कडेचा भाग मुरूमाने भरून घेऊन तो व्यवस्थित कऱण्यात आला आहे.

रस्त्यांची दुरुस्ती आणि डांबरीकरणानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभागाने शक्य असेल तिथे १० मीटर महामार्गाचे रुंदीकरण करून तो १५ मीटर करण्याचे पाऊल उचलले आहे. या महामार्गावर वाहतूककोंडीची पाच प्रमुख ठिकाणे आहेत. त्यात खालुंब्रे, खालुंब्रे घाट, एचपी चौक, म्हाडा सोसायटी, खराबवाडी यांचा समावेश आहे. या ठिकाणी पाचशे मीटर अंतरात महामार्ग १० वरून १५ मीटर रुंद करण्यात येणार आहे. तसेच, शक्य असेल तिथेही महामार्गाचे रुंदीकरण करण्यात येईल. हे काम ऑक्टोबरअखेरीस पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या महामार्गाच्या दुरुस्तीसह रुंदीकरणासाठी ४३ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *