Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

नीट पेपर लीक प्रकरणात मोटेगावकर कुटुंबाला मोठा धक्का; आदित्य मोटेगावकरवर दोन वर्षांसाठी नीट परीक्षेत बसण्यास बंदी, NTA कडून मोठी कारवाई

नीट पेपरफुटी प्रकरणात मोटेगावकर कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आलंय. NEET UG 2026 परीक्षेतील कथित पेपर लीक प्रकरणात लातूरमधील प्रसिद्ध मोटेगावकर कुटुंबाला मोठा धक्का बसलाय.

राष्ट्रीय परीक्षा एजन्सी अर्थात NTA कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक आणि रसायनशास्त्राचे शिक्षक शिवराज मोटेगावकर (Shivraj Motegaonkar) यांचा मुलगा आदित्य मोटेगावकर (Aditya Motegaonkar) याच्यावर आता दोन वर्षांसाठी नीट परीक्षेत बंदी घालण्यात आली आहे. आदित्य शिवराज मोटेगावकर यांची NEET UG 2026 ची उमेदवारी NTA ने रद्द केली आहे. तसंच, NEET UG 2027 ची परीक्षा देण्यासही आदित्य मोटेगावकर यांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. (NEET UG Paper Leak Case Marathi News)

दरम्यान, 3 मे 2026 रोजी झालेल्या NEET UG परीक्षेतील प्रश्नपत्रिका कथितरित्या लीक झाल्याच्या प्रकरणात आदित्य मोटेगावकर यांच्यावर प्रश्नपत्रिका मिळवणे किंवा शेअर केल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांवर NTA ने 15 जुलै रोजी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, आदित्य मोटेगावकर यांनी NTA ला दिलेल्या उत्तरात गैरप्रकार केल्याचा आरोप फेटाळून लावला. तसंच, आपल्याविरोधातील पुरावे आणि CBI कडून देण्यात आलेली माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.

NEET UG Paper Leak Case : 2026 च्या NEET प्रश्नपत्रिका कथित लीक प्रकरणातील लाभार्थी असल्याचं CBI ने केलं नमूद

दरम्यान, 3 मे रोजीची परीक्षा रद्द झाल्यानंतर 20 जून रोजी पुन्हा परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, आदित्य मोटेगावकर यांचा निकाल NTA कडून रोखून ठेवण्यात आला होता. यानंतर CBI कडून 17 सप्टेंबरला NTA ला पत्र पाठवण्यात आलं. या पत्रात आदित्य मोटेगावकर हे मे 2026 च्या NEET प्रश्नपत्रिका कथित लीक प्रकरणातील लाभार्थी असल्याचं CBI ने नमूद केलं आहे. या सर्व कागदपत्रांचा आणि उपलब्ध पुराव्यांचा विचार केल्यानंतर NTA च्या UFM समितीने संबंधित प्रकार हा NEET मधील Unfair Means Practices अर्थात गैरप्रकाराच्या श्रेणीत येत असल्याचं म्हटलंय आणि त्यानंतर अंतिम कारवाई करत NEET UG 2026 ची उमेदवारी रद्द करण्यातआलीआहे. तसेच NEET UG 2027 परीक्षा देण्यासही बंदी घालण्यातआलीआहे.

दरम्यान, 15 सप्टेंबर 2026 रोजी न्यायालयाने दिलेल्या आदेशातील निर्देशांनुसार ही कारवाई करण्यात आल्याचं NTA च्या पत्रात स्पष्ट करण्यात आलं आहे. मुख्य मुद्दा असा की, आदित्य मोटेगावकर यांनी आरोप नाकारले असले, तरी NTA ने CBI कडून प्राप्त माहितीसह उपलब्ध सामग्रीच्या आधारे त्यांच्यावर ही कारवाई केली आहे.

NEET UG Paper Leak Case : मोटेगावकर कुटुंबाला मोठा धक्का, नेमकंप्रकरणकाय?

नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमधील प्रसिद्ध मोटेगावकर कुटुंबाला मोठा धक्का बसलाय. आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक आणि रसायनशास्त्राचे शिक्षक शिवराज मोटेगावकर यांचा मुलगा आदित्य मोटेगावकर याच्यावर आता दोन वर्षांसाठी नीट परीक्षेत बंदी घालण्यात आली आहे. आदित्यने यंदाची नीट-यूजी 2026 परीक्षा दिली होती. मात्र, परीक्षेतील कथित गैरप्रकाराच्या आरोपांनंतर त्याची उमेदवारी रद्द करण्यात आली. त्यानंतर 20 जून रोजी त्याची पुनर्परीक्षा घेण्यात आली. या निर्णयाविरोधात आदित्यने हायकोर्टात धाव घेतली होती. त्यावर हायकोर्टाने एनटीएला अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते.

दरम्यान, सीबीआयच्या तपासात आदित्यचे वडील शिवराज मोटेगावकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, शिवराज मोटेगावकर यांच्या मोबाईलमध्ये रसायनशास्त्राच्या 132 हस्तलिखित प्रश्नांच्या प्रतिमा सापडल्या आणि त्यापैकी सुमारे 111 प्रश्न एनटीएच्या प्रश्नसंचाशी जुळल्याचं तपास यंत्रणेने न्यायालयात सांगितलं. सीबीआयच्या आरोपानुसार, आदित्य हा सहआरोपी पी. व्ही. कुलकर्णी यांच्या विशेष वर्गांना उपस्थित होता आणि त्याठिकाणी कथितरीत्या लीक झालेले रसायनशास्त्राचे प्रश्न त्याला मिळाले. आता याच प्रकरणात एनटीएने आदित्य मोटेगावकरला दोन वर्षांसाठी नीट परीक्षेतून अपात्र ठरवल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच, वडिलांवर सीबीआयचा तपास आणि मुलावर नीट परीक्षेत दोन वर्षांची बंदी असणारआहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *