सीना माढा व खैराव-मानेगाव उपसा सिंचन योजनेसंदर्भात पुढील आठवड्यात बैठक; जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निर्देश

सीना-माढा उपसा सिंचन योजनेच्या 962 कोटी रूपये खर्चाच्या तृतीय सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रस्तावास मंजूरी द्यावी. व सीना-माढा उपसा सिंचन योजनेच्या 234 कोटीच्या रूपयांच्या विशेष सुधारणा व दुरुस्ती योजनेतंर्गत पाईपलाईन व विद्युत मोटारी बदलण्याच्या कामास मंजुरी देऊन तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा.
तसेच खैराव-मानेगाव उपसा सिंचन योजनेस प्रशासकीय मान्यता द्यावी. अशी मागणी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांच्याकडे भेट घेऊन लेखी पत्राद्वारे केली असून, या संदर्भात पुढीलआठवड्यात तातडीने बैठक लावण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती जिल्हा दूध संघाचे चेअरमन तथा भाजपा नेते रणजीतसिंह शिंदे यांनी दिली.
याविषयी बोलताना रणजितसिंह शिंदे म्हणाले की, सीना माढा उपसा सिंचन योजना सन 2004- 05 मध्ये कार्यान्वित झालेली आहे. या योजनेत 16522 हेक्टर क्षेत्रापैंकी 14500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आलेले आहे. या योजनेचा द्वितीय सुप्रमा 623 कोटींचा रूपयांचा मंजूर झालेला आहे.
योजनेचे उर्वरित क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद असलेला नवीन 339 कोटींचा रूपयांचातृतीय सुप्रमा अहवाल तयार करण्यात आला आहे. पूर्वीचा मंजूर 623कोटी रूपयांचा आणि हा नवीन 339कोटी रूपयांचा असा मिळून एकूण 962 कोटी रूपयांचा तृतीय सुप्रमा अहवाल महामंडळामार्फत शासनास डिसेंबर 2025 मध्ये सादर करण्यात आला आहे.
तथापी, त्यास अद्यापही मंजूरी प्राप्त झालेली नाही. सुप्रमा मंजूरी नसल्यामुळे योजनेची कोणतीही नवी कामे हाती घेता येत नाहीत.या सुप्रमामध्ये माढा तालुक्यातील तुळशी, बावी, परितेवाडी, अंजनगांव (खे) या गावातील पाझर तलाव व साठवण तलाव भरून देण्यासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतुद करण्यात आली आहे. सद्यस्थितीत सप्टेंबर महिना संपत आला तरी माढा तालुक्यात पाऊस झालेला नाही. त्यामुळे तीव्र पाणी टंचाई जाणवत असून शेतातील उभी पिके जळु लागलेली आहेत.
तुळशी, बावी, परितेवाडी, अंजनगांव (खे) या गावातही भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली असून पाण्यासाठी या गावातील ग्रामस्थ वारंवारउपोषण व आंदोलने करून पाण्याची मागणी करीत आहेत.
तृतीय सुप्रमाच्या मान्यतेनंतर तुळशी, बावी, परितेवाडी, अंजनगांव (खेलोबा) या गावातील पाणी साठे भरून देण्याची नवीन कामे हाती घेता येणार आहेत. तसेच प्रकल्पाची ठप्प झालेली उर्वरित कामेही करता येतील त्यामुळे शासनास सादर केलेल्या 962 कोटी रक्कमेच्या तृतीय सुप्रमास तातडीने मान्यता देणेबाबत कार्यवाही करावी अशी विनंती केली आहे.
सीना माढा उपसा सिंचन योजनेच्या पाईपलाईन व विद्युत मोटारीचे आयुमान संपले असल्याने त्याची कार्यक्षमता कमी झालेली आहे. त्यामुळे टेल भागातील शेतक-यांच्या शेतीस पाणी पोहोचत नाही. सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प असून दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. शेतक-यांची उभी पिकेपाण्याअभावी करपू लागलेली असून शेतकरी वर्गात प्रचंड भिती व नाराजी आहे. त्यामुळे शेतक-यांचा आक्रोश वाढत चाललेला आहे.
सीना माढा उपसा सिंचन योजनेच्या विद्युत मोटारी बदलल्यास आधुनिक तंत्राच्या मोटारीने पुर्ण क्षमतेने पाणी उचलून कमी वेळेत योजनेच्या टेल भागातील शेतक-यांपर्यंत पाणी नेणे सोईचे होणार आहे. पाईपलाईन दुरूस्ती अभावी वारंवार बंद पडत असून पाईपलाईनचे आयुमान संपल्यामुळे अनेक ठिकाणी गळती होत असून पाईपलाईनची पाणी वहन क्षमता कमी झालेली आहे.
जलसंपदा विभागाच्या पाईपलाईन व विद्युत मोटारी बदलणेसाठी विशेष सुधारणा व दुरुस्ती प्रस्ताव महामंडळाच्या नियामक मंडळाच्या 9 सप्टेंबर रोजीच्या झालेल्या बैठकीमध्ये 234 कोटी रूपयांच्या प्रस्तावास प्राधान्यक्रम यादीत समावेश करण्यात आलेला आहे. त्यास तात्काळ मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी विनंती जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना केली असून जेणेकरून पाईप व नवीन मोटारी बसवून नवीन तंत्राच्या मोटारीने पूर्ण क्षमतेने पाणी देऊन पाण्याचे आवर्तन कमी वेळेत पूर्ण करता येईल असे सांगितले.
माढा तालुक्याच्या पूर्व भागातील मानेगांव, धानोरे, बुद्रुकवाडी, कापसेवाडी, हटकरवाडी, पाचफुलवाडी ही गावे गेली अनेक वर्षापासून पाण्यापासून वंचित असून कायम दुष्काळी भागातील आहेत. या गावांना इतर कोणत्याही उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळत नसल्याने पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे.
खैराव-मानेगाव उपसा सिंचन या योजनेस मुख्यमंत्री कार्यालयाकडून तत्वतः मान्यता प्राप्त झालेली आहे. या योजनेच्या कामाचे सर्व्हेक्शन पूर्ण झालेले आहे व त्यानंतर राज्य तांत्रिक सल्लागार समिती यांच्या छाननी अंती 196. 47 कोटी रूपये इतक्या रकमेचा प्रमा अहवाल कृष्णा खोरे विकास महामंडळामार्फत शासनास सादर करण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणास त्यांच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केलेला असून प्राधिकरणाने या प्रस्तावावर मुद्दे उपस्थित केल्याचे कळते.
तरी या योजनेचा परीपुर्ण प्रस्ताव मागवून घेवून योजनेस मंजुरी देऊन तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली आहे. या संदर्भात जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तातडीने पुढील आठवड्यात बैठक लावण्याचे निर्देश संबंधित अधिकार्यांना दिल्याचे रणजितसिंह शिंदे यांनी सांगितले.
यावेळी रणजितसिंह शिंदे यांच्या सोबतच्या शिष्टमंडळात जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे माजी सभापती शिवाजी कांबळे, जिल्हा परिषद सदस्य आण्णासाहेब ढाणे, तुळशीचे माजी सरपंच दिगंबर मामा माळी आदी उपस्थित होते.



