
राज्याच्या वीज गरजेचा मोठा भार वाहणाऱ्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या वीज निर्मितीवर यंदाच्या पावसाच्या लहरीपणाचा परिणाम होण्याची चिंता व्यक्त होत आहे.
एल निनो परिस्थितीमुळे पावसावर परिणाम झाल्यास त्याचा अप्रत्यक्ष फटका वीज केंद्राला बसू शकतो, अशी माहिती केंद्राचे मुख्य अभियंता अनिल काथोये यांनी मंगळवारी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेत दिली.
डीपीआरचा ‘चमत्कार’ कसा? : अवघ्या सहा महिन्यांत सुमारे १६ डीपीआर तयार होऊन त्यातील निम्म्याहून अधिक प्रस्तावांना वरिष्ठ स्तरावर मंजुरीही मिळाली कशी? या वेगाचे कौशल्य नेमके कोणते, याचे समाधानकारक उत्तर मात्र मुख्य अभियंत्यांना देता आले नाही.
डीपीआरवर ७७१ कोटींचा खर्च, अपेक्षित निर्मिती नाही : देखभाल-दुरुस्तीवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होत असताना वीज निर्मितीत अपेक्षित वाढ का होत नाही, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, मागील काही महिन्यांत तब्बल ७७१.८४ कोटी रुपयांचे १६ डीपीआर तयार करण्यात आल्याची माहिती आहे. तरीही अपेक्षित वीज निर्मिती होत नाही. यावर मुख्य अभियंता काथोये निरुत्तर झाले. ते संच जुने झाल्याचे सांगत होते. मात्र त्यावर पर्याय कोणते, याबाबत मात्र त्यांनी मौनच राहणेच पसंत केले.



