गैरहजर अधिकाऱ्यांचे पगार कापा! नाशिकरोड प्रभाग समितीत नगरसेवक आक्रमक, कारणे दाखवा नोटीस जारी

नाशिकरोड प्रभाग समितीच्या बैठकीत नागरिकांच्या विविध प्रश्नांवरून नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. वृक्षतोड, अनियमित पाणीपुरवठा, गढूळ पाणी, मोकाट कुत्र्यांचा उपद्रव, रस्त्यांवरील रेती, उड्डाणपुलावरील खड्डे, अतिक्रमाणे तसेच सार्वजनिक शौचालयातील वीजवापराच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला.
काही प्रश्नांवर विद्युत आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून एकमेकांकडे जबाबदारी ढकलली जात असल्याचे निदर्शनास आल्याने नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
प्रभाग सभापती रमेश धोंगडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नगरसेविका सीमा ताजने यांनी जिजामाता व्यायामशाळेतील वृक्षतोडीचा मुद्दा उपस्थित केला.
‘न्यायालयीन आदेशाची पायमल्ली, सर्रास छाटली गेली वृक्षवल्ली’ असा फलक दाखवत त्यांनी वृक्षतोडीचा निषेध केला. न्यायालयाच्या आदेशानंतरही झाडे कोणी तोडली आणि संबंधितांवर काय कारवाई करण्यात आली, याबाबत त्यांनी प्रशासनाकडे स्पष्टीकरण मागितले. संबंधितांवर तातडीने कारवाई न झाल्यास हा विषय न्यायालयात नेण्याचा इशाराही त्यांनी दिला.
नाशिकरोडसह प्रभाग क्रमांक २० मध्ये पाणीपुरवठ्याच्या वेळेत वारंवार बदल होत असल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. वेळेवर पाणी मिळत नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असून, याबाबत अधिकारी समाधानकारक उत्तरे देत नसल्याचा मुद्दा सीमा ताजने यांनी मांडला. नगरसेविका वैशाली दाणी यांनी प्रभागात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याचे निदर्शनास आणून दिले.
अधिकारी गैरहजर; कारवाईची मागणी
प्रभाग बैठकीला संबंधित अधिकारी उपस्थित राहत नसल्याबद्दल नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अधिकारी बैठकीला उपस्थित राहत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करावी किंवा त्यांच्या वेतनातून दंड वसूल करावा, अशी मागणी करण्यात आली. यावर सभापती रमेश धोंगडे यांनी अनुपस्थित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. शैलेश ढगे यांनी प्रभाग बैठकीच्या आदल्या दिवशी विभागीय अधिकाऱ्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना बैठकीस उपस्थित राहण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी केली.
उड्डाणपुलावरील खड्डे कायम
मागील प्रभाग बैठकीत उड्डाणपुलाच्या डांबरीकरणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. मात्र, महिना उलटूनही उड्डाणपुलावरील खड्डे बुजवण्यात आले नसल्याने नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारला. मुक्तिधाम परिसरातील अतिक्रमाणे अद्याप का हटवण्यात आलेली नाहीत, असा सवालही करण्यात आला. कैलास मुदलियार यांनी सार्वजनिक शौचालयातील वीज मीटरचा वापर अन्य व्यावसायिकांकडून केला जात असल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली.
मागील प्रभाग बैठक नगरसेवकांच्या बहिष्कारामुळे रद्द झाली होती. त्यावेळी विभागीय अधिकाऱ्यांवर कारवाई अथवा बदली करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, संबंधित अधिकारी याही बैठकीला उपस्थित असल्याबद्दल नगरसेविका भारती ताजनपुरे यांनी नाराजी व्यक्त केली



