Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

मुंबईतील सगळ्यात मोठी प्रॉपर्टी डिल, 711 कोटींना विकत घेतला अख्खा टॉवर, बिजनेसमन भाड्याच्या घरातून थेट महालात!

 मुंबईच्या मुलुंडमधील कापड व्यापाऱ्याच्या घरात जन्म, शिक्षण फक्त 12वी, कोणतीही मोठी डिग्री नसताना त्यांनी बिजनेसमन व्हायचं स्वप्न पाहिलं आणि या स्वप्नाला जिद्दीची जोड मिळाली. वयाच्या 40व्या वर्षापर्यंत भाड्याच्या घरात राहिल्यानंतर याच जिद्दीने त्यांनी आता मुंबईच्या जुहू भागात 711 कोटींमध्ये पूर्ण टॉवर विकत घेतलं आहे. Angel One चे फाऊंडर दिनेश ठक्कर यांची ही सक्सेस स्टोरी अनेक होतकरू बिजनेसमनना प्रेरणा देणारी आहे.

दिनेश ठक्कर यांनी जुहूमध्ये एक-दोन फ्लॅट नाही तर पूर्ण रहिवासी टॉवरच विकत घेतला आहे. देशातल्या रेसिडेन्शियल युनिटची ही सगळ्यात मोठी डिल असल्याचं सांगण्यात येत आहे. रियल इस्टेट कंपनी एम्बसी डेव्हलपमेंट्सने दिनेश ठक्कर यांच्यासोबत एमओयू साईन केलं आहे. जुहूच्या एम्बसी टेरेझा प्रोजेक्टमधील पूर्ण टॉवर दिनेश ठक्कर यांना विकला जाणार आहे.

711 कोटींचा आलिशान टॉवर?

711 कोटींचं हे टॉवर ग्राऊंड फ्लोअरशिवाय 7 मजली आहे. या टॉवरचा कार्पेट एरिया 63 हजार स्क्वेअर फुटाचा आहे. या हिशोबाने प्रॉपर्टीची किंमत 1.13 लाख रुपये प्रती स्क्वेअर फूट होते. एम्बसी टेरेझा जुहूच्या तारा रोडमधील अल्ट्रा-लक्झरी प्रोजेक्ट आहे. मुंबईतील प्रमुख आणि महागड्या एरियापैकी एक असा हा भाग आहे.

एम्बसी टेरेझा दोन एकरपेक्षा जास्त जमिनीवर पसरलेलं प्रोजेक्ट आहे. इथे जवळपास 50 लक्झरी घरं बनवण्यात आली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार प्रोजेक्टची ग्रॉस डेव्हलपमेंट व्हॅल्यू म्हणजेच जीडीव्ही 3 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. हे प्रोजेक्ट कमी डेनसिटी म्हणजेच ‘जास्त भागात कमी लोक’ या डिझाईनच्या अंतर्गत तयार करण्यात आलं आहे. पाच टॉवरच्या प्रत्येक मजल्यावर फक्त एकच घर असेल. प्रोजेक्टमध्ये मोठ्या घरांसह इनडोअर गार्डन, वेलनेस आणि लाईफस्टाईलच्या सुविधाही असतील. तसंच घरातून समुद्र आणि मुंबई शहर पाहता येणार आहे.

दिनेश ठक्कर यांनी ही प्रॉपर्टी विकत घेण्याचं कारण प्रायव्हसी, जास्त जागा आणि समुद्राचा व्ह्यू सांगितलं आहे. त्यांनी आपल्या नव्या घराचं नाव Angelus ठेवलं आहे. दिनेश ठक्कर यांनी या इमारतीमध्ये फक्त एक अपार्टमेंट विकत घेतलेलं नाही, तर त्यांनी ग्राऊंड प्लस 7 असा 8 मजल्यांचा 63 हजार स्क्वेअर फूट रेरा कार्पेट एरिया विकत घेतला आहे, त्यामुळे हे डील वेगळं आहे.

दिनेश ठक्कर यांचा संघर्ष

1990 साली दिनेश ठक्कर यांनी शेयर मार्केट ब्रोकरेजमध्ये पाऊल ठेवलं आणि त्यानंतर 6 वर्षांमध्ये त्यांनी एंजल ब्रोकिंग ही फिनटेक कंपनी सुरू केली. 2001 साली त्यांनी एका ऑनलाईन इंटरनेट ट्रेडिंग प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक केली, पण जेव्हा जगात डॉट कॉम बबल फुटला तेव्हा त्यांचे 80 टक्के पैसे बुडाले, पण तरीही दिनेश ठक्कर यांनी हार मानली नाही. कोणत्याही मोठ्या डिग्रीशिवाय त्यांनी देशातील सगळ्यात मोठा डिजिटल स्टॉक-ब्रोकिंग प्लॅटफॉर्म उभारला. दिनेश ठक्कर यांना भारतातील ब्रोकिंग सेक्टरमधल्या डिजीटल क्रांतीचे जनक मानलं जातं. टेक्नोलॉजीची ताकद वेळेआधीच ओळखून त्यांनी त्यांची कंपनी पूर्णपणे डिजिटल-फर्स्ट फायनान्शियल सर्व्हिसमध्ये बदलली आणि कंपनीचं नाव Angel One केलं. आज एंजल वन 27 हजार कोटींची मार्केट कॅप असलेली कंपनी आहे.

मुंबईच्या मुलुंडमध्ये एका कापड व्यापाऱ्याच्या घरात दिनेश ठक्कर यांचा जन्म झाला. ठाण्याच्या सेंट जॉन द बॅप्टिस्ट हायस्कूलमध्ये दिनेश ठक्कर यांनी त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण केलं, यानंतर त्यांनी मुंबईच्या केसी कॉलेजमधून 12वी पर्यंत शिक्षण घेतलं, यानंतर त्यांनी पारंपरिक उच्च शिक्षण न घेता वेगळा मार्ग निवडला. माझ्या आयुष्यातील हा सगळ्यात मोठा धोका होता, कोणत्याही डिग्रीशिवाय बिजनेस उभा केला जाऊ शकतो, यावर मला विश्वास होता, असं दिनेश ठक्कर एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *