SIR वरून निवडणूक आयोगावर हल्लाबोल; ‘३ कोटी २८ लाख मतदारांची नावे वगळली,’ हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR प्रक्रियेवरून काँग्रेसने निवडणूक आयोगाला घेरलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील तब्बल ३ कोटी २८ लाख मतदारांच्या नावांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, हा आकडा आणि त्यामागील निष्कर्ष हे सपकाळ यांनी केलेले आरोप आहेत.
हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. यावेळी मतदार यादीतील बदल, SIRप्रक्रिया आणि संशयित मतदारांचा डेटा याबाबत काँग्रेसने प्रश्न उपस्थित केल्याचं सपकाळ यांनी सांगितलं.
“2 कोटींहून अधिक मतदार प्रारूप यादीत समाविष्ट झालेले नाहीत”
सपकाळ यांच्या दाव्यानुसार, विधानसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात सुमारे ९ कोटी ७८ लाख मतदार होते. SIR प्रक्रियेनंतर मोठ्या संख्येने मतदार प्रारूप यादीत दिसत नसल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान, निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार, SIRनंतर महाराष्ट्राच्या प्रारूप मतदार यादीत ७,७१,६५,५६२ मतदार आहेत, तर २,०६,८८,४८७ मतदार प्रारूप यादीत समाविष्ट झालेले नाहीत. त्यामागे अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार नोंदींसह विविध कारणं देण्यात आली आहेत.
३ कोटी २८ लाख मतदारांचा डेटा सार्वजनिक करण्याची मागणी
याच पार्श्वभूमीवर सपकाळ यांनी ३ कोटी २८ लाख मतदारांचा डेटा सार्वजनिक करण्याची मागणी केली. मतदारसंघ आणि बूथनिहाय माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. दावे-हरकतींसाठी दिलेल्या मुदतीवरही काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. सण-उत्सवांच्या काळात नागरिकांना पुरेसा वेळ मिळावा, यासाठी मुदत वाढवण्याची मागणी केल्याचं सपकाळ म्हणाले.
दुष्काळसदृश्य परिस्थितीवरूनही सरकारवर निशाणा
दरम्यान, सपकाळ यांनी राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीवरूनही सरकारवर निशाणा साधला. सरसकट दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
याशिवाय राहुल बोंद्रे यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाच्या चर्चेवरून भाजपवर दबाव आणि ब्लॅकमेलिंगचे आरोपही सपकाळ यांनी केले. तसेच IIT बॉम्बेतील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित करत शैक्षणिक व्यवस्थेतील समस्यांवर सरकारने उत्तर द्यावं, अशी मागणी त्यांनी केली.



