आमदार शिव्या देतो म्हणून त्याचे गुलाम झालात का? बाळासाहेब थोरात प्रांत अधिकाऱ्यावर भडकले; शेतकऱ्यांसमोर झापलं

आमदार शिव्या देतो म्हणून तुम्ही त्याचे गुलाम झालात का? त्याची दादागिरी पाहून जर तुम्ही गुलाम होत असाल, तर सामान्य लोकही तेच करतील. आमदाराचे फ्लेक्स लावायला तुम्ही कशाला जाता? असा सवाल उपस्थित करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रांत अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. संगमनेर येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चादरम्यान प्रशासनाच्या बेफिकीर वृत्तीमुळे बाळासाहेब थोरात आणि शेतकरी प्रचंड संतापल्याचे पाहायला मिळाले.
राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, या मुख्य मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात संगमनेरमध्ये भव्य ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला होता. या मोर्च्याच्या माध्यमातून प्रशासनाला निवेदन देण्यात येणार होते. मात्र, मोर्चा तहसील व प्रांत कार्यालयावर धडकल्यानंतर निवेदन स्वीकारण्यासाठी स्वतः प्रांत अधिकारी उपस्थित नसल्याचे समोर आले. लोकप्रतिनिधी आणि शेतकरी ताटकळत उभे असतानाही अधिकारी न आल्याने आंदोलकांचा पार भडकला.
खुर्ची फेकली, तोडफोडीचा प्रयत्न
निवेदन घेण्यासाठी प्रांत अधिकारी उपस्थित नसल्याचे पाहताच आंदोलकांचा रोष अनावर झाला. संतप्त झालेल्या तापलेल्या आंदोलकांनी थेट प्रांत अधिकाऱ्यांची खुर्ची बाहेर फेकून दिली. तसेच कार्यालयात घुसून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही काळ परिसर प्रचंड तणावपूर्ण बनला होता.
प्रांत अधिकारी घटनास्थळी दाखल; थोरातांनी सुनावले खडे बोल
आंदोलकांचा हा प्रचंड रोष पाहता प्रांत अधिकारी अरूण मुंडे तातडीने आंदोलनस्थळी दाखल झाले. ते समोर येताच बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत खडे बोल सुनावले. सत्ताधारी आमदारांच्या दबावाखाली काम करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेचा थोरातांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला.शेवटी, प्रांत अधिकारी अरूण मुंडे आणि वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर आणि मागण्यांवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आले व मोर्चा स्थगित करण्यात आला.



