TCS मध्ये ३.२ लाखांचे वार्षिक पॅकेज; अवघ्या एका वर्षात ॲमेझॉनमध्ये मिळवली ४० लाखांची नोकरी!

जर जिद्द आणि चिकाटी असेल तर तुमच्या यशाच्या मार्गात कोणताही अडथळा फार काळ टीकत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सोशल मीडियावर अशाच एका आयटी इंजिनिअरचा प्रवास प्रचंड चर्चेत आहे.
निमशहरी भागातील सरकारी महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या एका तरुणाने टीसीएसमध्ये अवघ्या ३.२ लाखांच्या पगारावर करिअरची सुरुवात केली. मात्र, अवघ्या एकाच वर्षात मोठी झेप घेत त्याने आपले वार्षिक पॅकेज ३.२ लाखांवरून थेट ४० लाख रुपयांपर्यंत नेऊन दाखवले आहे. सौरभ मिश्रा असे या तरुणाचे नाव असून तो सध्या ‘ॲमेझॉन’ या जगातील आघाडीच्या कंपनीत काम करत आहे.
कॉलेजमध्ये कॅम्पस प्लेसमेंटपेक्षा ‘गेट’ परीक्षेवर भर
‘विकासअलवेज’ या युजरने ‘एक्स’ वर शेअर केलेल्या माहितीनुसार, सौरभ मिश्रा यांनी यूपीटीसी या टियर-३ सरकारी महाविद्यालयातून बी.टेक पूर्ण केले. कॉलेज प्लेसमेंट काळात इतर मित्र मुलाखतीची तयारी करत होते. तेव्हा सौरभ संगणकशास्त्र शाखेच्या ‘गेट’ परीक्षेची तयारी करत होता. त्या दृष्टीने तयारी म्हणून त्याने प्रामुख्याने सिद्धांतावर अधिक भर दिला. कोडिंग किंवा पारंपरिक प्लेसमेंटच्या तयारीकडे दुर्लक्ष झाले. मात्र, कौटुंबिक परिस्थिती अचानक बदलल्यामुळे आणि कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याची गरज निर्माण झाल्यामुळे त्यांना आपला प्लॅन बदलावा लागला. शेवटच्या काही दिवसात तयारी करुनही त्यांना टीसीएस या देशातील आघाडीच्या कंपनीत ‘असिस्टंट सिस्टीम इंजिनिअर’ म्हणून नोकरी मिळाली. जिथे त्यांना वार्षिक ३.२ लाख रुपये पॅकेज मिळाले.
एका वर्षातच पालटले नशीब
टीसीएसमधील हा निर्णय त्यांच्या करिअरचा एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरला. टीसीएसमध्ये अवघ्या एक वर्ष काम केल्यानंतर, सौरभ यांनी कठोर मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर थेट ॲमेझॉन कंपनीतील मुलाखतीचे वेगवेगळे टप्पे यशस्वीरित्या पूर्ण केले. यामुळे त्यांचे वार्षिक पॅकेज ३.२ लाखांवरून थेट ४० लाख रुपयांपेक्षा अधिक झाले. सध्या ते ॲमेझॉनमध्ये ‘क्लाउड इंजिनिअर’ या पदावर कार्यरत असून, तंत्रज्ञान क्षेत्रात ते अनेकांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत.
सोशल मीडियावर युजर्सकडून कौतुकाचा वर्षाव
सौरभ मिश्रा यांचा हा प्रेरणादायी प्रवास समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नेटिझन्सनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका युजरने कौतुक करताना लिहिले की, ‘त्याने अगदी तळापासून सुरुवात केली आणि थेट जगातील एका अग्रगण्य टेक कंपनीपर्यंत मजल मारली.’ दुसऱ्या एका युजरने म्हटले, ‘जेव्हा तुमच्यात दृढ निश्चय असतो, तेव्हा शेवटी तुम्हाला हवे असलेले यश नक्की मिळते.’ तिसऱ्या एका युजरने प्रतिक्रिया दिली की, ‘हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे, कारण त्याने कधीही हार मानली नाही.’



