Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासाने महामार्गांवर गर्दी; आनेवाडी, तासवडे टोलनाक्यांवर वाहनांच्या रांगा

सातारा: गौरी आणि घरगुती गणपतीच्या विसर्जन सोहळ्यानंतर लाखो चाकरमान्यांनी आणि गणेशभक्तांनी रविवारी दुपारपासून पुणे-मुंबईच्या दिशेने परतीचा मार्ग धरल्याने पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीचा प्रचंड ताण निर्माण झाला.

जिल्ह्यातील आनेवाडी आणि तासवडे टोलनाक्यांवर दिवसभर वाहनांच्या १ ते २ किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागून अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली. तासन् तास कोंडीत अडकून पडल्याने प्रवासी व वाहनचालक अक्षरशः त्रस्त झाले.

बहुतांश घरांमध्ये गौरी आणि घरगुती गणपतींचे विसर्जन पार पडल्यानंतर चाकरमान्यांनी आपल्या गावाला निरोप देत नोकरी-व्यवसाय व कामाच्या ठिकाणी जाण्यास सुरुवात केली. यामुळे रविवारी सकाळपासूनच महामार्गावर कोल्हापूर आणि साताऱ्याकडून पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर (लेन) वाहनांची प्रचंड आवक सुरू झाली.

फास्टटॅग’ असतानाही रांगा

आनेवाडी आणि तासवडे टोलनाक्यांवर ‘फास्टटॅग’ची सुविधा असूनही प्रवाशांची संख्या इतकी होती की, टोल नाक्यांच्या मागे १ ते २ किलोमीटरपर्यंत गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. महामार्ग पोलीस आणि टोल प्रशासनाचे कर्मचारी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी व वाहतूक सुरळीत करण्यासाठी घटनास्थळी तैनात होते. मात्र, वाहनांच्या अतिरिक्त संख्येमुळे टोल प्रशासनाच्या नियोजनाचा पार फज्जा उडाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *