
मुंबई: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून अस्तित्वात आलेल्या मॉडेल नोंदणी कार्यालयांच्या उपयोगितेची दखल केंद्र सरकारने घेतली असून पुणे येथे सुरू झालेले मॉडेल नोंदणी कार्यालय आता देशभर सुरू करण्याचे निर्देश केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्रालयाच्या भूमी संसाधन विभागाने दिले आहेत.
केंद्रीय भू-संसाधन विभागाचे सचिव नरेंद्र भूषण यांनी अशी कार्यालये देशभर सुरू करण्यासाठी प्रत्येक कार्यालयासाठी ५० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आल्याचे सांगितले.
भूषण यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित ‘केंद्रीय नोंदणी विधेयक, २०२६’संदर्भात सर्व राज्यांच्या नोंदणी महानिरीक्षकांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला राज्याचे नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे व उपमहानिरीक्षक राजेंद्र मुठे उपस्थित होते.
या बैठकीत प्रस्तावित विधेयकातील तरतुदी, संभाव्य परिणाम आणि राज्यस्तरावरील सुधारणांबाबत सविस्तर चर्चा करून राज्यांचे अभिप्राय व सूचना जाणून घेण्यात आल्या.
बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नोंदणी व मुद्रांक विभागाने महसूलवाढीसोबतच नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि कार्यक्षम सेवा देण्यासाठी विविध नावीन्यपूर्ण योजना यशस्वीपणे राबविल्या जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिल्यावर, सर्व राज्यांनी असे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.



