खाकी’त फोफावली खाबूगिरी; महसूल विभागात सर्वाधिक संशयित, राज्यात 3 कोटी तीन लाखांची लाचखोरी उघड

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत राज्यभरात ५३१ सापळे रचून नोंद झालेल्या गुन्ह्यांत ७५८ संशयितांनी साडेनऊ महिन्यांत तीन कोटी तीन लाख ५९ हजार २७२ रुपयांची लाच घेतली आहे. त्यापैकी राज्य पोलिसांच्या विविध विभागांत ८३ प्रकरणांत १३१ संशयितांनी ६९ लाख चार हजार २०० रुपयांची लाचखोरी केल्याचे निष्पन्न झाले असून, वन विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) नोंदीनुसार, सर्वाधिक सापळे नाशिक परिक्षेत्रात असून, ११० गुन्ह्यात १७७ संशयित, दुसऱ्या क्रमांकावर ठाण्यात १०२ गुन्ह्यांत १३१, छत्रपती संभाजीनगरमध्ये ८३ गुन्ह्यांत १०९, पुण्यात ७५ गुन्ह्यांत ९२, अमरावतीत ५४ गुन्ह्यांत ७५, नांदेडमध्ये ५४ गुन्ह्यांत ४२, नागपूरमध्ये ४८ गुन्ह्यांत ६९ आणि मुंबई परिक्षेत्रात सर्वांत कमी २७ गुन्ह्यांत ४१ संशयित निष्पन्न झाले आहेत.
नगरपालिका, क्रीडा विभाग, अन्न व औषधी द्रव्ये विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, धर्मादाय आयुक्त, म्हाडा, एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, बेस्ट, सुधार प्रन्यास, कारागृह, बंदर, कौशल्य विकास व महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ या विभागात २०२६मध्ये एकही लाचखोरीचा गुन्हा नोंद नाही. त्यामुळे ‘खाबूगिरी’ची रक्कम ‘शून्य’ असल्याची नोंद ‘एसीबी’ने केली आहे.
इतर विभागांतील लाचखोरी
राज्य परिवहन मंडळांत तीन गुन्ह्यांत चार लाख १०२ रुपये, ‘जलसंपदा’त तीन लाख ९० हजार ३०० रुपये, समाजकल्याण विभागात तीन लाख ५५ हजार ५०० रुपये, सहकार व पणन विभागात तीन लाख १४ हजार ५००, नगर परिषदेत तीन लाख चार हजार रुपये, राज्य उत्पादन शुल्कात अडीच लाख रुपये, पाणीपुरवठा विभागात दोन लाख ३० हजार रुपयांची लाचखोरी उघड झाली आहे.



