TET पेपरफुटीतील दोन फरार आरोपींना अटक, पुण्याच्या हॉटेलात पेपर खरेदी विक्रीबद्दल चर्चा!

टीईटी पेपर फुटी प्रकरणात फरार असलेल्या दोन आरोपींना अटक करण्यात पोलीस यंत्रणेला यश आले आहे. या दोन्ही फरार आरोपींना भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना २३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. आजच्या दोन आरोपींच्या अटकेनंतर टीईटी प्रकरणात आतापर्यंत एकूण आरोपींची संख्या १८ वर पोहोचली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी न्यायलायत दोषारोप पत्र देखील सादर केले आहे.
आरोपींना बीड आणि दिल्लीतून ठोकल्या बेड्या
प्रकाश मिसाळ (रा. बीड) आणि अशोककुमार बाबूलाल शाव (रा.दिल्ली ) असे अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. प्रकाश मिसाळ यास बीड येथून तर अशोक कुमार शाव यास दिल्ली येथून पोलिसांनी अटक केली आहे.
पुण्याच्या हॉटेलात पेपर खरेदी विक्रीबद्दल चर्चा
टीईटी पेपरफुटी प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेला आरोपी कपिल दहिया हा प्रकाश मिसाळ याला पुणे येथे भेटण्यासाठी आला होता. एका हॉटेलमध्ये या दोघांची भेट झाली होती. त्यावेळी टीईटी परीक्षेच्या पेपर संदर्भातील खरेदी विक्री बद्दल या दोघांमध्ये चर्चा झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तर अटक करण्यात आलेला दुसरा आरोपी अशोककुमार शाव याच्या दिल्ली येथील राहत्या घरातून तपास पथकाला १४९ लोकांच्या नावाची यादी पोलीसांनी जप्त केली आहे.
विद्यार्थ्यांच्या नावांची लिस्ट, कोणकोण हिटलिस्टवर?
या यादीत टीईटी परीक्षेला बसलेल्या १८ परिक्षार्थींची नावे असल्याचे तपासात समोर आले आहेत. त्यामुळे या यादीतील व्यक्तींशी आरोपींनी काही आर्थिक व्यवहार केले आहेत का यासंदर्भात पोलीस तपास सुरू आहे. न्यायालयाने या दोघांना २३ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती आरोपींचे वकील ऍड.शैलेश गायकवाड यांनी दिली आहे.



