Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

मल्लिका शेरावतने मराठीत केलं तुकाराम मुंढेंचं कौतुक, इडली चटणी खातानाचा व्हिडिओ शेअर करत मानले आभार

महाराष्ट्र राज्यभरात अन्न भेसळी विरोधात कडक कारवाई करणारे महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे गेल्या काही काळापासून सतत चर्चेत आहेत. बऱ्याच कलाकारांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

आता अभिनेत्री मल्लिका शेरावतने जनतेच्या अन्न आणि पेयांचा दर्जा सुधारण्यासाठी मुंढे यांनी केलेल्या प्रयत्नांची व घेतलेल्या दखलीची प्रशंसा केली आहे.

तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील अन्न व अन्न सुरक्षा संस्थेने (FDA) संपूर्ण महाराष्ट्रातील अन्न व्यवसाय, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि गोदामांवर मोठी कारवाई सुरू केली आहे. अशातच अभिनेत्री मल्लिका शेरावतने व्हिडिओ शेअर करुन त्यांचे कौतुक केले आहे. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, अन्न नियामक संस्थेने मे महिन्यापासून 3000 हून अधिक ठिकाणी तपासण्या केल्या आहेत.

काय म्हणाली मल्लिका शेरावत

अभिनेत्री मल्लिका शेरावतने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर इडली आणि चटणी खातानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. थेट कॅमेऱ्याकडे पाहून ती मराठीत म्हणाली की, त्यांनी आपल्या कामातून खऱ्या अर्थाने स्वतःला वेगळे सिद्ध केले आहे. ती पुढे म्हणाली, “तुमच्यामुळे मी आता काळजी न करता खाऊ शकते, कारण तुमचे कडक नियम आणि तुमची आदर्श तत्त्वे आम्हा सर्वांना सुरक्षित ठेवत आहेत. तुमच्या बारीक नजरेतून काहीही सुटत नाही. खूप खूप धन्यवाद.”

काही दिवसांपूर्वीच तुकाराम मुंढे यांनी पिझ्झा हटच्या चार आउटलेट्सचे फुड परमिट निलंबित केले असून, एका क्रिकेट क्लब, एका हॉटेल आणि एका लोकप्रिय रेस्टॉरंटवरही कारवाई केली आहे. राज्याचे एफडीए रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, रस्त्यावरील खानावळी आणि इतर अन्न सेवा आस्थापनांची (ऑनलाइन डिलिव्हरी प्लॅटफॉर्मद्वारे अन्न सेवा देणाऱ्यांसह) तपासणी करत आहे. अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास, परवाना निलंबन आणि सुधारणेसाठी नोटिसा यांसारख्या कारवाई करण्यात आल्या आहेत.

त्यांनी सांगितले की, पुणे विभागात सर्वाधिक परवाने निलंबित करण्यात आले असून, त्यामुळे नियमांच्या उल्लंघनाच्या बाबतीत हा विभाग आघाडीवर आहे. याव्यतिरिक्त, निरीक्षकांनी कोल्ड-चेन आणि स्वच्छतेशी संबंधित गंभीर त्रुटींसाठी 948 सुधारणा सूचना जारी केल्या.

यावर्षी मे 2026 मध्ये तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून, त्यांनी भेसळ करणाऱ्यांवर केलेल्या कारवाईने संपूर्ण राज्य हादरले आहे. तसेच बऱ्याच हॉस्पिटल, औषधे बनवणारे कारखाने अशा अनेक ठिकाणी धाडी टाकल्या व जिथे बेकायदेशीर काम चालू होती ती त्वरीत थांबवली.

गेल्या काही दिवसांत केदार शिंदे, अरबाज शेख, श्वेता तिवारी, सुनील लहरी, ट्विंकल खन्ना, इशा तलवार, परेश रावल, अभिजीत केळकर यांसारख्या अनेक कलाकारांनी तुकाराम मुंढेच्या कार्यपद्धतीचे भरभरुन कौतुक केले आहे. तसेच बरेचदा एखादा व्यक्ती चांगलं काम करत असेल , राजकिय दबावाला न जुमानता योग्य त्या नियम व तत्वांवर काम करत असेल तर त्यांची बदली केले जाते असे म्हणतात. जेव्हा तुकाराम मुंढेंच्या बदली बाबत चर्चा होऊ लागलेल्या तेव्हा अनेकांनी त्यांची बदली होऊ नये अशी मागणी केलेली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *