
कोल्हापूर : सरकारच्या दबावाला बळी पडून १५ ऑक्टोबरपासून कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न केला, तर शेतकरी आणि कारखानदार यांच्यातील संघर्ष अटळ असेल, असा थेट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. दरम्यानच शेट्टी यांनी कोल्हापूर, सांगली आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील प्रमुख साखर कारखानदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी कारखानदारांना निवेदन देत आंदोलनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.राजू शेट्टी यांनी आज, मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील, संजय मंडलिक, समरजित घाटगे, स्वरूप महाडिक, सिस्मा चे अध्यक्ष योगेश पाटील यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाध्यक्ष अजित पोवार, धनाजी पाटील, राजाराम देसाई, डॅा. बाळासाहेब पाटील, प्रभू भोजे, अविनाश मगदूम, बाजीराव पाटील यांचेसह स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, साखरेचा किमान हमीभाव (MSP) प्रतिकिलो ५० रुपये निश्चित करावा. ‘सी-हेव्ही’ इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७० रुपये करावा आणि इथेनॉल निर्मितीवरील जाचक निर्बंध उठवावेत. केंद्र सरकारने नाबार्ड , एसडीएफ फंड किंवा एनसीडीसी अंतर्गत खासगी व सहकारी साखर कारखान्यांना वार्षिक ४ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून द्यावे. इथेनॅाल उत्पादनावर बंदी घातल्याने प्रकल्पांच्या कर्जाच्या व्याजाचा व हप्त्याचा भार कारखान्यावर येणार असल्याने संपुर्ण वर्षभराची व्याज सवलत व हप्त्यास मुदतवाढ योजना जाहीर करावी यासह विविध मागण्या केल्या आहेत.
हा संघर्ष केवळ शेतकऱ्यांचा नाही, तर.. हा संघर्ष केवळ शेतकऱ्यांचा नसून संपूर्ण साखर कारखानदारी वाचवण्याचा असल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. जर साखरेचे आणि इथेनॉलचे दर वाढले, तरच कारखाने टिकतील आणि शेतकरीही जगतील. त्यामुळे कारखानदारांनी सरकारच्या दबावाला बळी न पडता, मागण्या मान्य होईपर्यंत कारखाने सुरू करू नयेत.
..तर शेतकरी ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा राहील
सीमाभागातील (कर्नाटक) कारखाने आधी सुरू झाल्यास महाराष्ट्रातील ऊस तिकडे पळवला जाण्याची शक्यता असते, त्यामुळे राजू शेट्टी यांनी कर्नाटक सीमाभागातील कारखानदारांशीही चर्चा करून त्यांना या आंदोलनात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. कारखानदार एकत्र आले तर ऊस उत्पादक शेतकरी पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.१५ ऑक्टोबरच्या मुहूर्तावर लक्ष साखर आयुक्त आणि सरकारने गळीत हंगाम सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यानच शेट्टी यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे अन् कारखानदारांच्या भेटीगाठी सुरु केल्याने यंदाचा ऊस हंगाम वादळी ठरण्याची शक्यता आहे.



