Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थाच्या ध्वजारोहणाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू; ३१ ऑक्टोबरला सोहळा

नाशिक – पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहेत. नाशिक व त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी दुपारी १२ वाजून २ मिनिटांच्या मुहूर्तावर हा कार्यक्रम होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री आणि अन्य नेते या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वतयारीबाबत आढावा बैठक पार पडली. यावेळी कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी ध्वजारोहण सोहळ्याची पूर्वतयारी सूक्ष्म नियोजनातून करावी.

सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून कामांना गती द्यावी. तयारीमध्ये कोणत्याही प्रकारची शिथिलता राहू नये, असे निर्देश दिले. ध्वजारोहण सोहळ्यास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह अन्य मान्यवरांना निमंत्रण देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेचे परिपूर्ण नियोजन करावे. ध्वजारोहण सोहळ्यासाठी वाहतूक व्यवस्था, वाहनतळ, गर्दी नियंत्रण, सुरक्षा, आरोग्य व स्वच्छतेचे काटेकोर नियोजन करावे. नियोजनात कोणतीही त्रुटी राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही महाजन यांनी सूचित केले.

बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक शहरातील रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त या दोन्ही ठिकाणी ३१ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी ध्वजारोहण होणार असल्याचे सांगितले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नाशिक किंवा त्र्यंबकेश्वर येथील ध्वजारोहण सोहळा होईल. एका ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार उपस्थित असतील. या सोहळ्यास केंद्रातील नेतेही उपस्थित राहणार आहेत. दर १२ वर्षांनी ध्वजारोहणाचे जसे नियोजन केले जाते, तसेच यावेळीही केले जाणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *