अडीच तासांत २८ खात्यांत फिरवले ३.७० कोटी, इन्फ्रा कंपनीला गंडा; मालकाच्या मुलीचा डीपी बघून अकाउंटंट फसला

छत्रपती संभाजीनगर: मालकाच्या मुलीचा डीपी असलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरून आलेल्या मेसेजच्या आधारे ३ कोटी ७० लाख रुपये दोन बँक खात्यांत वळते करण्यात आले. हा मेसेज मालकाकडूनच आल्याचे समजून, कोणतीही शहानिशा न करता अकाउंटंटने पैसे वळते केले.
अकाउंटंटच्या या निष्काळजीपणामुळेच सायबर भामट्यांनी कंपनीला गंडा घातला. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. पैसे दोन खात्यांत जमा होताच अवघ्या अडीच तासांत ते २८ इतर खात्यांमध्ये फिरवत करून सायबर भामट्यांनी चलाखी दाखवली.
गारखेडा येथील एस डी दौंडे इन्फ्रा प्रा. लि. या कंपनीत १४ आणि १५ सप्टेंबरदरम्यान हा प्रकार घडला. अकाउंटंट दिगंबर माने (वय ४२, रा. वाळूज एमआयडीसी) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. माने हे या कंपनीत सहा वर्षांपासून अकाउंटंट म्हणून काम करतात. त्यांना १४ सप्टेंबरला सकाळी १० वाजता एका अनोळखी नंबरवरून इंग्रजीत मेसेज आला. त्यात कंपनीच्या बँक खात्यातील शिल्लक रकमेबाबत (बॅलन्स) विचारणा करण्यात आली होती.
माने यांनी बॅलन्सचा स्क्रीनशॉट पाठवला. त्यानंतर दहा मिनिटांतच ‘स्काय पे प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘आरएमआरएस जन कल्याण हॉस्पिटल’ यांचे दोन वेगवेगळे खाते क्रमांक पाठवून, त्यावर अनुक्रमे १ कोटी ७० लाख आणि २ कोटी रुपये भरण्यास सांगण्यात आले. माने यांनी त्याला संमती दर्शवली. मात्र, १४ सप्टेंबरला गणेश चतुर्थीनिमित्त बँकेला सुटी असल्याने पैसे पाठवता येणार नाहीत, असे मेसेजद्वारे कळवले. ज्या २८ खात्यांमध्ये ही रक्कम फिरवली गेली ती खाती दक्षिण आणि उत्तर भारतातील विविध ठिकाणची आहेत. पोलिसांकडून खात्यांवर होल्ड करेपर्यंत ही रक्कम आणखी इतर खात्यांवर वळवली जात होती, असे सायबर पोलिसांनी सांगितले.



