Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

सातारच्या सुपुत्राने नायजेरियात रुजवली गणेशोत्सवाची परंपरा; १६ वर्षांपासून लागोसमध्ये बाप्पाचा जयघोष, सातासमुद्रापार मराठी मातीचा सुगंध

‘गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…’च्या जयघोषाने सातासमुद्रापार नायजेरियातील लागोस शहरातही भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली गणेशोत्सवाची परंपरा परदेशातही मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने जपली जात असून, आनेवाडी (ता.

जावळी) गावचे सुपुत्र मुकेश महामुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या १६ वर्षांपासून हा गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे.

कामानिमित्त तब्बल १६ वर्षांपूर्वी नायजेरियातील लागोस शहरात गेलेल्या मुकेश महामुलकर यांनी तेथे गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. सुरुवातीला काही भारतीयांच्या सहभागातून सुरू झालेला हा उत्सव आज मोठ्या स्वरूपात साजरा होत आहे. लागोस येथील स्ट्रलिंग ऑइल कंपनीमध्ये गणेश मंडळाची स्थापना करून दहा दिवस गणरायाची विधिवत पूजा-अर्चा, आरती तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

विशेष म्हणजे या गणेशोत्सवात केवळ भारतीयच नव्हे, तर नायजेरियातील स्थानिक नागरिकही उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. गणपती बाप्पाच्या जयघोषाबरोबरच ‘राम नाम’च्या गजरानेही परिसर भक्तिमय होत असून, गणेशोत्सवाच्या निमित्ताने भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि परंपरेची ओळख स्थानिक नागरिकांना करून दिली जात आहे.

गेली १६ वर्षे परदेशात राहूनही या तरुणांनी आपल्या मातृभूमीशी आणि संस्कृतीशी असलेली नाळ कायम ठेवली आहे. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी विसरायची नाही, असा संस्कृती जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात येत आहे.

लागोस शहरात मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा होणारा हा गणेशोत्सव पाहण्यासाठी स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. भारतीय संस्कृतीतील श्रद्धा, एकोपा आणि उत्सवप्रियतेचा सुंदर संगम या गणेशोत्सवाच्या माध्यमातून परदेशात अनुभवायला मिळत आहे.

परदेशातही गणरायाच्या चरणी भक्तिभाव!

“आम्ही स्थापन केलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी दहा दिवस विविध प्रकारचे देखावे, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. परदेशात असलो तरी या दहा दिवसांत आम्ही मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा करतो. येथील स्थानिक नागरिकही उत्स्फूर्तपणे या उत्सवात सहभागी होतात. आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची जपणूक करण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *