पुणे : हिंजवडीतील पायाभूत सुविधांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश

हिंजवडी आयटी पार्क आणि परिसरातील वाहतूक कोंडी, सार्वजनिक वाहतूक, रस्ते, पाणीपुरवठा, वीज तसेच कचरा व्यवस्थापनाच्या समस्यांवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विविध शासकीय यंत्रणा आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.
हिंजवडी परिसरातील पायाभूत सुविधांचा एकात्मिक पद्धतीने विकास करून नागरिक आणि आयटी क्षेत्रातील मनुष्यबळाला आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
हिंजवडी परिसरातील समस्या सोडविण्यासाठी आयोजित उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार शंकर मांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम तसेच हिंजवडी, मान आणि मारुंजे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आयटी कंपन्यांमध्ये ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कंपनीनिहाय प्रवासाचा डेटा संकलित करण्यात येणार आहे. या आधारे पीएमपीएमएल बससेवेचे मार्ग, प्रारंभ व अंतिम थांबे निश्चित करून आवश्यक त्या ठिकाणी बससेवा वाढविण्यात येणार आहे. सुमारे २० ते ३० अतिरिक्त बसेसचे तातडीने नियोजन करण्यात येत असून, भविष्यात उपलब्ध होणाऱ्या नवीन ५०० बसेसमध्ये हिंजवडी आणि चाकण परिसराला प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच मेट्रो स्थानकांपासून कार्यालये आणि नागरिकांच्या घरांपर्यंत पोहोचण्यासाठी फिडर बससेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
हिंजवडी परिसरातील रस्ते रुंदीकरणासाठी सहा प्रमुख रस्ते प्राधान्याने निश्चित करण्यात आले आहेत. या रस्त्यांसाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून १ डिसेंबरपर्यंत प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डुडी यांनी दिले. रस्ते रुंदीकरणात अडथळा ठरणारे वीजेचे खांब आणि भूमिगत केबल्स हलविण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने अंदाजपत्रक तयार करून कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. सर्व्हिस रोडच्या डांबरीकरणाचे काम पुढील १० ते १५ दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.वीजपुरवठ्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी हिंजवडी परिसरात नवीन वीज उपकेंद्रे उभारण्याच्या कामाला गती देण्यात येणार आहे. लवळे आणि महाळुंगे येथील प्रस्तावित उपकेंद्रांसाठी मंजुरीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याबरोबरच आवश्यक जागा ॲडव्हान्स पझेशनने उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डुडी यांनी दिल्या.



