
महाबळेश्वर : ‘‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच ग्रामविकासाच्या विविध योजनांना गती देण्यासाठी महाबळेश्वर येथे राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय कार्यशाळेचा पार पडली.
याचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी ग्रामविकास व पंचायत राज विभाग मुख्य सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने ग्रामीण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी धोरण, नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणीचे महामंथन ‘‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसह ग्रामविकास विभागाच्या विविध योजनांना गती देण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा सुरू आहे. कार्यशाळेला सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्यासह राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तसेच ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. कार्यशाळेत ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानाच्या जिल्हानिहाय प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. अभियानाची उद्दिष्टपूर्ती, अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या प्रशासकीय अडचणी व त्यावरील उपाययोजना, सन २०२६-२७ चे नियोजन तसेच निर्धारित उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आवश्यक कार्यवाही यावर विचारमंथन केले.
मंत्री जयकुमार गोरे यांनी ‘ग्रामपंचायती अधिक सक्षम करणे, विविध शासकीय योजनांमध्ये प्रभावी समन्वय साधणे, योजनांचा लाभ तळागाळातील अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि स्थानिक गरजांनुसार विकासकामांना गती देणे, या दिशेने प्रशासनाने अधिक परिणामकारकपणे कार्य करण्याबाबत मार्गदर्शन केले.



