Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

गणेश आगमन मिरवणुकीत फटाक्यांच्या ठिणगीने ड्रॅगन प्रतिकृतीला आग; साताऱ्यात मंडळाच्या अध्यक्षावर गुन्हा

सातारा : गणेश आगमन सोहळ्याच्या मिरवणुकीदरम्यान निष्काळजीपणे फटाके लावून मिरवणुकीतील देखाव्याला आग लागण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गणेश मंडळाच्या अध्यक्षाविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नितीन प्रमोद भोसले (रा. शाहूपुरी), असे गुन्हा दाखल झालेल्या मंडळाच्या अध्यक्षाचे नाव आहे. याबाबत हवालदार अमोल साळुंखे यांनी फिर्याद दिली आहे. सातारा शहरातील राजवाडा परिसरात मंगळवारी गणेश आगमन सोहळ्याची मिरवणूक सुरू होती. या मिरवणुकीत मंगळवार पेठेतील सह्याद्री गणेश उत्सव मंडळ सहभागी झाले होते. मंडळाची मिरवणूक राजवाडा परिसरात आली असताना देखाव्यासाठी तयार करण्यात आलेली ड्रॅगनची प्रतिकृती नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती.

मिरवणूक पुढे जात असताना राजवाडा बसस्थानक परिसरात फटाके लावण्यात आले. यावेळी फटाक्यांमधून उडालेल्या ठिणगीने मिरवणुकीच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीवरील कापडाने पेट घेतला. काही क्षणांतच आग पसरून ड्रॅगनच्या प्रतिकृतीलाही आगीने वेढले. या दुर्घटनेत ड्रॅगनची प्रतिकृती तसेच जनरेटर जळून नुकसान झाले.

या प्रकारामुळे मिरवणुकीत सहभागी नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. फटाके लावताना आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी फिर्यादीत नमूद केले आहे. निष्काळजीपणे फटाके लावून सार्वजनिक ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी मंडळाचे अध्यक्ष नितीन भोसले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *