
भारतात १२ आणि १३ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या १८व्या ब्रिक्स शिखर परिषदेत बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान सहभागी होणार नाहीत. बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री हुमायून कबीर यांनी दावा केला आहे की, पंतप्रधान तारिक रहमान यांना ब्रिक्स शिखर परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आलेले नाही.
मात्र, बांगलादेश या शिखर परिषदेत आपला एक प्रतिनिधी पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले असून, तारिक रहमान यांच्या सहभागाची शक्यता त्यांनी फेटाळून लावली.
एका वृत्तानुसार, पत्रकारांशी संवाद साधताना हुमायून कबीर म्हणाले, “आम्ही कसे जाणार? बांगलादेश सरकारमधील कोणाला आमंत्रित करण्यात आले आहे का? आमच्या पंतप्रधानांना आमंत्रित करण्यात आलेले नाही. आमच्या पंतप्रधानांना आमंत्रित करण्यात आले होते, असे तुम्हाला कोणी सांगितले? बिम्सटेकच्या अध्यक्षांना आमंत्रित करण्यात आले होते. मग तुम्ही हा प्रश्न का विचारत आहात?” हुमायून कबीर यांनी स्पष्ट केले की, भारताकडून बांगलादेशच्या पंतप्रधानांना कोणतेही वैयक्तिक निमंत्रण पाठवण्यात आले नव्हते. त्याऐवजी हे निमंत्रण ‘बिम्सटेक’च्या अध्यक्ष या नात्याने पाठवण्यात आले होते. मात्र, बांगलादेश या शिखर परिषदेत आपला एक प्रतिनिधी पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, भारत १२ ते १३ सप्टेंबरदरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे १८व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन करत आहे. ‘लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी’ या विषयाच्या अनुषंगाने ही शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी अनेक आंतरराष्ट्रीय नेते आणि उच्चस्तरीय शिष्टमंडळे राजधानी दिल्लीत दाखल होण्याची अपेक्षा आहे.



