Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

या’ प्रथांबाबतच्या लढ्याला पाठिंबा द्या; राहुल गांधींकडे पुरोगामी मुस्लीम कार्यकर्त्यांची मोठी मागणी

पुणे : ‘भारतीय मुस्लीम तरुणांपर्यंत लिंगभावाधारित न्यायदृष्टीचा विस्तार करण्यासाठी आमच्यासोबत उभे रहावे,’ असे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुरोगामी-सुधारणावादी कार्यकर्त्यांनी राहुल गांधी खुले पत्र लिहून केली आहे.

‘पुण्यातील जेन झी मधील तरुणींच्या मेळाव्यात आपण केलेल्या अभूतपूर्व आणि प्रेरणादायी भाषणाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. पुरुषसत्ताक व्यवस्था मोडून काढण्याचे आणि समाजातील संस्थात्मक पुरुषवर्चस्वाला आव्हान देण्याचे आपले स्पष्ट आवाहन देशभरातील असंख्य तरुणींच्या मनाला भिडले आहे.

मनुस्मृतीने स्त्रीला मुलगी, बहीण, पत्नी किंवा आई अशा कोणत्याही भूमिकेत असली तरी आयुष्यभर पुरुषावर अवलंबून राहण्यास भाग पाडले, याकडे आपण स्पष्टपणे लक्ष वेधले. हा केवळ एका ग्रंथाचा प्रश्न नसून, पिढ्यान्‌पिढ्या लाखो तरुणी ज्या वास्तवाविरुद्ध संघर्ष करत आल्या आहेत, त्याचे आपण ठामपणे शब्दांकन केले आहे. पुरुषप्रधान आणि रूढीवादी समाजव्यवस्थेत संस्थात्मक विषमता कायम असेल, तर खरी स्वातंत्र्याची भावना आणि समानता शक्य नाही ही जाणीव आपल्या वक्तव्यातून ठळकपणे समोर आली,’ असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. भारतीय राज्यघटनेनुसार सन्मान, प्रतिष्ठा आणि समान नागरिकत्व मिळविण्यासाठी संघर्ष करणाऱ्या धाडसी मुस्लीम महिलांच्या लढ्याकडे आपण गांभीर्याने पाहावे. न्याय आणि निष्पक्षता कुराणच्या मूलभूत शिकवणीतही दिसून येते,’ याकडे राहुल गांधी यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

पुरुषसत्ता ही सर्वव्यापी शक्ती आहे. तिला कोणतीही सीमा, जात किंवा धर्म मान्य नसतो. हिंदू तसेच इतर समाजांमध्ये रूढीवादी पुरुषवर्चस्वाविरुद्धचा संघर्ष सुरू असतानाच, भारतीय मुस्लीम समाजातील महिला आणि तरुणाईही तितक्याच निर्धाराने संघर्ष करत आहेत. या महत्त्वपूर्ण वास्तवाची देशाने दखल घेणे आवश्यक आहे. निःसंशयपणे, भीती, द्वेष आणि समाजात फूट पाडणाऱ्या राजकारणाची वाढती लाट यामुळे आज भारतीय मुस्लीम समाजामध्ये असुरक्षिततेची तीव्र भावना निर्माण झाली आहे. अल्पसंख्याकांचे संरक्षण आणि हक्कांचे रक्षण करण्यासाठी आपण या जातीयवादी फॅसिस्ट शक्तींविरुद्ध संघर्ष करत असलो, तरी लिंगन्यायावर आधारित सुधारणांचा प्रश्न आता ‘योग्य वेळ’ येण्याची वाट पाहत राहू शकत नाही. त्याबाबत ठामपणे आणि स्पष्टपणे बोलण्याची वेळ आता आली आहे,’ अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या पत्रावर शमसुद्दीन तांबोळी (मुस्लिम सत्यशोधक मंडळ), जावेद आनंद आणि फिरोज मिठीबोरवाला (इंडियन मुस्लिम्स फॉर सेक्युलर डेमोक्रसी), झाकिया सोमन आणि नूरजहाँ सफिया नियाझ (भारतीय मुस्लीम महिला आंदोलन) आणि बदर सईद (रोशनी) यांची स्वाक्षरी आहे.

राहुल गांधी यांच्याकडे करण्यात आलेल्या मागण्या

  • बहुपत्नीत्वाविरुद्ध कायदेशीर संरक्षण मिळावे.
  • निकाह हलाला आणि मुता विवाह यांसारख्या भेदभावपूर्ण प्रथांचा पूर्णपणे अंत करावा.
  • तत्काळ तिहेरी तलाकविरोधी कायदेशीर संरक्षण कायम ठेवून ते अधिक बळकट करावे, कारण स्त्रियांच्या सन्मान आणि प्रतिष्ठेसाठी मिळवलेला हा महत्त्वपूर्ण विजय आहे.
  • कुटुंबातील सर्व महिलांना समान वारसाहक्क मिळावा, जेणेकरून त्यांना आर्थिक स्वावलंबनाची हमी मिळेल.
  • महिलांच्या विवाहाचे एकसमान कायदेशीर वय १८ वर्षे काटेकोरपणे लागू करावे आणि कथित व्यक्तिगत कायद्याच्या अपवादांच्या आडून होणारे बालविवाह थांबवावेत.
  • महिलांच्या जननेंद्रिय विच्छेदनाची प्रथा पूर्णपणे बंद करावी, जेणेकरून महिलांच्या शरीराची अखंडता आणि स्वायत्तता सुरक्षित राहील.
  • धार्मिक स्थळांमध्ये महिलांना कोणताही अडथळा न आणता प्रवेश मिळावा आणि इतर श्रद्धावानांप्रमाणेच त्यांना मशिदींमध्ये प्रवेश करून नमाज अदा करण्याचा समान अधिकार असावा.
  • घटस्फोट, पोटगी आणि मुलांचा ताबा यांसाठी न्याय्य, समानतावादी आणि पुरोगामी कायदेशीर चौकट निर्माण करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *