जरांगेंनी उपोषणाचा हट्ट सोडावा अन् संवादाचा मार्ग अनुसरा; ज्योती मेटेंचं भावनिक आवाहन!

बीड : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील आंदोलनाची तीव्रता वाढत असताना शिवसंग्राम संघटनेच्या अध्यक्षा ज्योती मेटे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्याचे आवाहन केले आहे.
राज्य सरकारने जरांगे यांच्या १५ पैकी १२ मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे आता उपोषण ताणून धरण्याचा आणि मुंबईच्या दिशेने जाण्याचा हट्ट सोडून सरकारने मान्य केलेल्या मागण्यांचे यश स्वीकारावे, असे मेटे यांनी म्हटले आहे.
बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ज्योती मेटे यांनी मराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाजूसह आंदोलनाच्या पद्धतीवरही भाष्य केले. “सरकारने १५ पैकी १२ मागण्या मान्य केल्या आहेत. सरकारची भूमिका कायदेशीरदृष्ट्या योग्य असेल, तर आता उपोषणाचा हट्ट कशासाठी?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
छत्रपतींच्या पुतळ्यासमोर अपशब्द वापरण्यावर नाराजी –
आंदोलनादरम्यान वापरल्या जाणाऱ्या भाषेवरही ज्योती मेटे यांनी नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्राला राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार लाभले आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी बसून शिवीगाळ करणे किंवा अपशब्द वापरणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे यासाठीचा लढा योग्य असून त्याला शिवसंग्रामचा पूर्ण पाठिंबा असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘शिंदे समितीने ५८ लाखांहून अधिक नोंदी शोधल्या’ –
आरक्षणाच्या कायदेशीर चौकटीचा विचार करता सरकारने घेतलेले निर्णय योग्य असल्याचा दावा मेटे यांनी केला. शिंदे समितीच्या माध्यमातून ५८ लाख २६ हजार ८६८ नोंदी शोधून काढण्याचे काम सरकारने केले आहे, असे त्यांनी सांगितले. सरकारने चर्चेचे दरवाजे खुले ठेवून १५ पैकी १२ मागण्या मान्य केल्या असतील, तर आंदोलकांनीही अडमुठेपणा सोडून संवादाचा मार्ग स्वीकारला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
‘आरक्षणाच्या संघर्षात मी माझे कुंकू गमावले’ –
ज्योती मेटे यांनी यावेळी आपल्या वैयक्तिक भावनाही व्यक्त केल्या. “आरक्षणाच्या या संघर्षात मी माझे कुंकू गमावले आहे. मराठा समाजाचे दुःख आणि वेदना काय असतात, हे माझ्यापेक्षा वेगळे कोणाला ठाऊक?” असे त्या म्हणाल्या. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचे नेतृत्व करत असल्याने त्यांच्या आरोग्याची आणि जीवाची काळजी वाटणे स्वाभाविक असल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारने मान्य केलेल्या मागण्यांचे यश स्वीकारून, कायदेशीर बाबींचा विचार करून जरांगे यांनी उपोषणाची सांगता करावी आणि पुढील वाटचाल करावी, असे भावनिक आवाहन ज्योती मेटे यांनी केले.
बीड : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील आंदोलनाची तीव्रता वाढत असताना शिवसंग्राम संघटनेच्या अध्यक्षा ज्योती मेटे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकारने जरांगे यांच्या १५ पैकी १२ मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे आता उपोषण ताणून धरण्याचा आणि मुंबईच्या दिशेने जाण्याचा हट्ट सोडून सरकारने मान्य केलेल्या मागण्यांचे यश स्वीकारावे, असे मेटे यांनी म्हटले आहे.



