नंदुरबार शिवसेना मेळाव्यात राजकीय बॉम्बगोळे; उदय सामंत, गुलाबराव पाटील यांचे मित्रपक्षांना चिमटे

नंदुरबार – नंदुरबार जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपातील वाद चव्हाट्यावर आला असून असमान निधी वाटपावरुन शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार चंद्रकात रघुवंशी हे शिंदे गटाच्या दोन मंत्र्यासमोर रडल्याचे विदारक चित्र समोर आले.
यावरुन शिंदे गटाच्या मेळाव्यात मंत्री उदय सामंत आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी मित्रपक्षांसह विरोधकांवरही जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास असणाऱ्या एकाही शिवसैनिकाचा विश्वासघात अथवा अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन सामंत यांनी मेळाव्यात दिले.
नंदुरबार जिल्ह्यात महायुतीमध्ये कित्येक महिन्यांपासून धुसफूस आहे. जिल्ह्यात शिंदे गटाचे आमश्या पाडवी आणि चंद्रकांत रघुवंशी असे दोन आमदार आहेत. नियोजन समितीच्या ठरलेल्या निधी वाटपाच्या सुत्रानुसार या दोन्ही आमदारांच्या वाटेला अत्यल्प निधी येत असल्याने कार्यकर्त्यांची कामे करायची कशी, अशी हतबलता रघुवंशी यांनी मांडली. मंत्र्यांसमोर त्यांना रडू कोसळले. याबाबत थेट वरिष्ठ पातळीवर पक्षनिहाय निधी देण्याची विनंती त्यांनी मंत्री उदय सामंत आणि मंत्री गुलाबराव पाटील यांना केली.
नंदुरबारमध्ये दोन आमदार असतानाही शिंदे गट प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल करत असल्याचे सांगत उदय सामंत यांनी पालकमंत्र्यांच्या कानावर शिवसैनिकांच्या अडचणी घालून त्या सोडविण्याचे आश्वासन दिले. भविष्यात नंदुरबारचा शिवसेनेचा जिल्हा परिषद अध्यक्ष आपल्या व्यासपीठावर बसलेला पाहिजे, असे म्हणत त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेनेची महत्त्वाकांक्षा स्पष्ट केली. मराठीच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्या ठाकरे गट आणि मनसेलाही सामंतांनी लक्ष्य केले. एकनाथ शिंदे यांना लंडनमध्ये पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली, ही अभिमानाची बाब असल्याचे सामंत म्हणाले. उद्योग विभागाच्या माध्यमातून नंदुरबारमध्ये आदिवासी उद्योग क्लस्टर उभारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. शिवसैनिकांना नाहक त्रास देणाऱ्या उद्योजकांना सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या खास शैलीत मेळावा आयोजित करण्यासाठी उदय सामंतांना आजचा पोळ्याचा दिवस दिसला का, असा चिमटा काढला. नंदुरबारमध्ये शिवसेनेचे नंदीच जिंकतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. काही लोकांनी आपल्याला आणि आपल्या नेत्याला संपविण्याचा विडा उचलला असल्याचा दावा करत गुलाबराव पाटील यांनी शेरोशायरीच्या माध्यमातून विरोधकांना लक्ष्य केले. निधी वाटपाबाबत नियम ठरलेले असून विधान परिषद सदस्यांना निधीच्या सूचना देण्याची मागणी त्यांनी केली.
‘एकनाथ शिंदे साहेबांना काही लोक तीन साडे तीन वर्षांचे बाळ म्हणतात; मात्र आमच्या पक्षाबरोबर ८७ लोकप्रतिनिधी आहेत,’ असे सांगत पाटील यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. ‘आपण ज्याच्याशी आय लव्ह यू करतो, त्याच्यावर पक्कं प्रेम करतो; मग समोरचा कसा वागला तरी,’ असे म्हणत त्यांनी मित्रपक्षांच्या राजकारणावर मिश्किल भाष्य केले.’चंदू भैया साधे नाहीत; त्यांनी खासदार पाडले आणि आमदार पाडले. मला बोलायला भाग पाडू नका, नाहीतर टीव्हीवाले माझ्या मागे लागतील,’ असा सूचक इशारा देत नंदुरबारच्या राजकारणात खळबळ उडवून दिली.



