चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग 7 वर्षांनंतर भारत दौऱ्यावर; पंतप्रधान मोदींच्या निमंत्रणावरून BRICS शिखर परिषदेला उपस्थित राहणार

नवी दिल्ली: चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या 18व्या BRICS शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी याबाबत अधिकृत पुष्टी केली. विशेष म्हणजे 2020 मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चीन सीमेवरील संघर्षानंतर दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर शी जिनपिंग यांचा हा पहिलाच भारत दौरा असेल. तब्बल सात वर्षांनंतर ते भारतात येणार आहेत.
भारत आणि चीनमधील संबंध 2020 मधील गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले होते. या पार्श्वभूमीवर शी जिनपिंग यांचा भारत दौरा आणि BRICS परिषदेत त्यांचा सहभाग महत्त्वाचा मानला जात आहे.
पंतप्रधान मोदींच्या निमंत्रणावरून भारत दौरा
भारतामधील चीनचे राजदूत श्यू फेईहोंग यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग BRICS शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत.
शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याची पुष्टी होण्यापूर्वी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी राष्ट्राध्यक्षांच्या नवी दिल्ली दौऱ्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर चीनच्या राजदूतांनी शी जिनपिंग यांच्या दौऱ्याची पुष्टी केली. सात वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात
शी जिनपिंग यांनी यापूर्वी 2019 मध्ये भारताचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी चेन्नईजवळील मामल्लपुरम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अनौपचारिक शिखर बैठक घेतली होती. 2019 नंतर आता ते पुन्हा भारतात येत आहेत.
यापूर्वी शी जिनपिंग 2016 मध्ये गोवा येथे BRICS शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात आले होते. भारताचा त्यांचा पहिला दौरा सप्टेंबर 2014 मध्ये झाला होता. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यापक चर्चा केली होती. विशेष म्हणजे 2014 मधील हा दौरा दोन्ही नेत्यांच्या सत्तेतील पहिल्या कार्यकाळात झाला होता.
BRICS परिषद अशा वेळी होत आहे…
12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीमध्ये होणारी BRICS शिखर परिषद अशा वेळी होत आहे; जेव्हा 2024 पासून BRICSचा सदस्य असलेल्या इराणवर अमेरिकेने आणि इस्रायलने सहा महिन्यांपूर्वी हल्ले केले आहेत.
या संघर्षाचा जागतिक ऊर्जा बाजारावरही मोठा परिणाम झाला आहे. जगातील तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाच्या मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 100 डॉलरपेक्षा अधिक गेल्या आहेत. होर्मुझची सामुद्रधुनी ही जागतिक तेल व्यापारातील महत्त्वाची ‘चोक पॉइंट’ मानली जाते. त्यामुळे या भागातील संघर्षाचा परिणाम केवळ संबंधित देशांपुरता मर्यादित न राहता जागतिक अर्थव्यवस्था आणि ऊर्जा पुरवठ्यावरही होतो.
BRICSचा विस्तार
BRICSची सुरुवात ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या गटाने झाली. मात्र 2024 मध्ये या गटाचा मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात आला. त्यामध्ये इजिप्त, इथिओपिया, इराण आणि संयुक्त अरब अमिरातीचा समावेश करण्यात आला. त्यानंतर 2025 मध्ये इंडोनेशियानेही BRICSमध्ये प्रवेश केला.
सध्या BRICS हा जगातील प्रमुख उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना एकत्र आणणारा प्रभावशाली गट बनला आहे. या गटातील 11 देश मिळून जगाच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 49.5 टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात. तसेच जागतिक GDPमध्ये त्यांचा वाटा सुमारे 40 टक्के, तर जागतिक व्यापारातील वाटा सुमारे 26 टक्के आहे.
यामुळे नवी दिल्ली येथे होणाऱ्या BRICS शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. विशेषतः सात वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येत असल्याने भारत-चीन संबंधांच्या दृष्टीनेही या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.



