Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

Mumbai Vijaydurga Ro-Ro service : विजयदुर्ग रो-रो सेवा पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली

रायगड : मुंबई भाऊचा धक्का ते विजयदुर्ग अशी सुरू होऊन अवघ्या ८ दिवसांत बंद झालेली रो-राे जलवाहतूक सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी मत्‍स्य आणि बंदर विकास बैठक घेणार आहे. यावेळी ३ हजार एवढे असलेले तिकिटाचे चढे दर किफायतशीर करण्यावर भर दिला जाणार आहे.

गणपती उत्‍सवाच्या काळात किमान ही सेवा सुरू व्हावी, यासाठी प्रयत्‍न आहेत.

मुंबई – मध्य-पूर्व आशियातील युद्ध परिस्थितीचे पडसाद आता कोकणच्या महत्त्वाकांक्षी मुंबई (भाऊचा धक्का) – विजयदुर्ग रोरो (रो-पॅक्स) फेरी सेवेलाही बसला होता. तांत्रिक बिघाडानंतर ही सेवा बंद झाली होती. मात्र आता लोकांना परवडतील असे किफायतशीर दर केले जाणार आहेत.

युद्धामुळे या जहाजाच्या दुरुस्तीसाठी लागणाऱ्या सुट्या भागांचा पुरवठा रखडल्याने या सेवेत खंड पडला होता. आता दर कमी करू ही सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्‍न आहे. १ मार्च २०२६ पासून एमटूएम फेरीज् प्रा. लि. कंपनीच्या ‘एमटूएम प्रिन्सेस’ या जहाजाद्वारे ही सेवा सुरू करण्यात आली होती. मुंबई ते विजयदुर्ग हा समुद्री प्रवास केवळ ६ ते ७ तासांत पूर्ण होत होता.

कोकणवासीयांसाठी हा प्रकल्प दिलासादायक ठरला होता. मात्र अवघ्या सहा फेऱ्यांनंतरच सेवा बंद पडल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर ही सेवा सुरू करण्यासाठी मत्‍स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा पुढाकार घेत आहे.

विजयदुर्गला सुरू झालेली ही सेवा सहाव्या फेरीदरम्यान विजयदुर्गहून मुंबईकडे येताना समुद्रातील तरंगत्या कचऱ्यामुळे जहाजाच्या इंजिनात बिघाड झाला. चार इंजिनांपैकी तीन इंजिन बंद पडल्याने जहाजाची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात घटली. सुरक्षिततेचा विचार करून सेवा तातडीने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

युद्धामुळे दुरुस्ती रखडली

इंजिन दुरुस्तीसाठी लागणारे महत्त्वाचे सुटे भाग परदेशातून मागविण्यात आले होते. मात्र मध्य-पूर्व आशियातील युद्ध परिस्थितीमुळे या साहित्याच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले होते. सध्या युद्ध थांबले असले तरी सुटे पार्टबाबत उपलब्धता झाली नसल्यानेही सेवा खंडीत होती. आता ती सुरू करण्याचे प्रयत्‍न सुरू आहेत. सध्या अलिबाग ते भाऊचा धक्का अशी रो-रो सेवा सुरू आहे. ही सेवा यशस्वी झाली असून याच धर्तीवर आता पुढील सेवा सुरु करण्याचे प्रयत्‍न आहेत.

दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर केंद्र शासनाच्या संबंधित यंत्रणांकडून जहाजाची तांत्रिक तपासणी केली जाणार आहे. सर्व सुरक्षा निकष पूर्ण झाल्यानंतरच सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर

दरम्यान, या घटनेमुळे रोरो सेवेच्या तांत्रिक तयारीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. महाराष्ट्र सागरी मंडळाने दुरुस्ती प्रक्रियेवर लक्ष ठेवले असल्याचा दावा केला असला तरी, सेवा सुरू झाल्यानंतर अल्पावधीतच निर्माण झालेल्या या अडचणीमुळे प्रकल्पाच्या देखभाल व्यवस्थेवर चर्चा सुरू झाली आहे. कोकणासाठी जलवाहतुकीचा वेगवान पर्याय म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या सेवेपुढे विश्वासार्हता टिकवण्याचे आव्हान उभे राहिले असून सेवा पुन्हा कधी सुरू होणार याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *