
अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेले व्यापार युद्ध, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची बदललेली धोरणे, लादलेले सीमा शुल्क आदी कारणांमुळे गेल्या काही दिवसांपासून कच्या तेलाच्या किंमतीत अभूतपुर्व घसरण होताना दिसत आहे.
कच्च्या तेलाच्या किमती १३ टक्क्यांपर्यंत घसरल्या आहेत. ही घसरण गेल्या दोन वर्षांतील सर्वात मोठी साप्ताहिक घसरण आहे. आता तेलाच्या किमती तीन वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. याचा परिणाम भारतातही दिसेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
कच्या तेलाच्या किंमती उतरल्या
आखाती देशातील तेलाची किंमत प्रति बॅरल 65 डाॅलरपर्यंत घसरली आहे. अमेरिकन तेलाची किंमत प्रति बॅरल 62 डाॅलरपेक्षा कमी झाली आहे. जेव्हा या किमती भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित केल्या गेल्या तेव्हा एक लिटर तेलाची किंमत सुमारे ३५ रुपये कमी होते. असे असूनही भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर अजूनही १०० रुपयांच्या वर आहेत. या घसरणीचा परिणाम अद्याप भारतात दिसून आला नसला तरी, येत्या काही दिवसांत हे भाव भारतीय बाजारपेठेतही उतरतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार
गेल्यावर्षी मार्च २०२४ मध्ये सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत फक्त २ रुपयांची किरकोळ कपात केली होती. तेव्हापासून त्यांच्या किमतीत कोणताही महत्त्वपूर्ण बदल झालेला नाही. भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर अजूनही १०० रुपयांपेक्षा जास्त आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति लिटर ३५ रुपयांपर्यंत खाली आली आहे. तरीही भारतातील पेट्रोल डिझेलच्या किमती उतरलेल्या नाहीत. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरण अजून काही दिवस अशीच राहिली तर भारतातील पेट्रोल डिझेलचे भाव नक्कीच कमी होणार आहेत.
कशामुळे उतरल्या किंमती?
कच्च्या तेलाच्या किमती घसरण्याची अनेक कारणे आहेत. एक मुख्य कारण म्हणजे, अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे जागतिक मंदीचा धोका निर्माण झाला आहे. जागतिक आर्थिक मंदीचा परिणाम कच्च्या तेलाच्या मागणीवर होईल. म्हणूनच कच्च्या तेलाच्या किमती खाली येत आहेत. पेट्रोलियम निर्यातदार देशांच्या संघटनेने (OPEC) देखील उत्पादन वाढवण्याची योजना आखली आहे. ज्यामुळे बाजारात पुरवठा आणखी वाढेल.
भारतात पेट्रोल कमी होईल का?
येत्या काळात कच्च्या तेलाच्या किमती आणखी कमी होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही २० ते ३० रुपयांनी कमी होतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु काही तज्ज्ञांचे असेही मत आहे की जर सरकारने विंडफॉल टॅक्स पुन्हा लागू केला तर ही कपात शक्य होणार नाही. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कच्च्या तेलाच्या किमती आणखी कमी होऊ शकतात आणि याचा थेट परिणाम भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर होईल. तथापि, सरकारी धोरणे आणि कर रचनेमुळे या घसरणीचा भारतात किती फायदा होईल, हे येणारा काळात समजणार आहे.