राजकीय

अजित पवारांचा धनंजय मुंडेंना पहिला धक्का, बीडबाबत घेतला मोठा निर्णय


बीड : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराडला काही दिवसांपूर्वी सीआयडीनं बेड्या ठोकल्या होत्या.

त्यानंतर मंगळवारी कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे वाल्मिक कराडच्या सुटकेचे मार्ग काही काळासाठी बंद झाले आहेत.

धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याने विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षाकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून यासाठी दबाव टाकला जात असल्याची देखील चर्चा आहे.

 

या सगळ्या कारवाईदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना पहिला धक्का दिला आहे. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाची संपूर्ण कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासून बीड प्रकरणावरून अजित पवार वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते. आता पहिल्यांदाच अजित पवारांनी थेट धनंजय मुंडेंच्या मुळावर घाव घातल्याचं बोललं जातंय. बीड जिल्ह्यातील अजित पवार गटाची संपूर्ण कार्यकारणी बरखास्त झाल्याची माहिती बीडचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी दिली आहे.

 

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार मंगळवारी रात्रीपासून सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. इथून पुढे जिल्हा पदाधिकारी निवडताना चारित्र्य पडताळणी केली जाणार आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश दिला जाणार नाही, असा निर्णय अजित पवार गटाकडून घेण्यात आला आहे. खरं तर, आतापर्यंत बीड जिल्ह्यातील सर्व कार्यकारणी धनंजय मुंडेंच्या सल्ल्यानुसारच नियुक्त व्हायची, अशात आता अजित पवारांनी ही कार्यकारणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्याने हा धनंजय मुंडेंसाठी मोठा धक्का मानला जातोय.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *