वर्गणी काढून जागा घेऊन द्या… पंकजा मुंडेंनी समर्थकांनाच आपल्यासाठी बीडमध्ये घर बांधून देण्याचं आवाहन केलं
![](https://navgannews.in/wp-content/uploads/2024/04/Screenshot_20240409_111015_1.jpg)
बीड : दिवंगत भारतीय जनता पार्टीने नेते गोपीनाथ मुंडेंचा पारंपारिक मतदारसंघ असलेल्या बीडमधून यंदा भाजपाने त्यांच्या कन्या पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली आहे.
पंकजा यांची थेट लढत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणेंशी होणार आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच या मतदारसंघात दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. सामान्यपणे उमेदवार मतदरांना आश्वासनं देतात. मात्र सोमवारी पंकजा मुंडेंनी समर्थकांनाच आपल्यासाठी बीडमध्ये घर बांधून देण्याचं आवाहन केलं.
वर्गणी काढून जागा घेऊन द्या…
पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणामध्ये निवडून आल्यानंतर सर्वात आधी आपण बीडमध्ये घर बांधणार असल्याचं म्हटलं आहे. पंकजा मुंडेंनी आपल्याकडे पैसे नसल्याचं कार्यकर्त्यांना सांगितलं. “तुम्ही मला जागा घेऊन दिली तर मी बीडमध्ये घर बांधेन. कारण माझ्याकडे पैसे नाहीत. तुम्ही वर्गणी काढून जागा घेऊन दिल्यास मी तिथं भूमीपूजन करेन. पहिली कुदळ मारुन तुमच्याच नावावर घर बांधेन. त्यानंतर मरेपर्यंत मी तिथे राहीन,” अशी भावनिक साद पंकजा यांनी बीडमधील कार्यकर्त्यांना घातली. हे घर बांधल्यानंतर तिथून कशाप्रकारे कारभार चालवणार याबद्दलही पंकजा यांनी भाष्य केलं.
या घरातून कशाप्रकारे चालवणार कारभार?
“आपण बीडमध्ये छानसं घर बांधू. माझी जेव्हा आष्टी, गेवराई आणि बीड मतदारसंघात कामं असतली तेव्ही मी बीडमधल्या घरात राहीन. तर केज, माजलगाव आणि परळीत कामं असतील तेव्हा परळीला मुक्कामी जाईन. या घरात राहून तिथूनच तुमच्याशी संपर्कात राहीन, असा मी सर्व कार्यकर्त्यांना शब्द देत आहे. मी हा शब्द कार्यकर्त्यांना देत असून इथं त्यांच्या भेटीगाठीसाठी राहण्याचा माझा मानस आहे,” असं पंकजा म्हणाल्या.
या प्रेमाची तुलना नाही
फडणवीस यांच्या सरकारमध्ये महिला व बालविकासमंत्री राहिलेल्या पंकजा मुंडेंनी, मला इथल्या लोकांनी भरपूर प्रेम आणि माया दिली. मी देशातच काय जगातही कुठे गेले तरी या प्रेमाची तुलना करता येणार नाही. कोणत्याही संपत्तीची या प्रेमाबरोबर तुलना करता येणार नाही, असं पंकजा म्हणाल्या.
तोडीस तोड टक्कर
यंदाच्या निवडणुकीमध्ये भाजपाने विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचं लोकसभेचं तिकीट कापून त्यांच्या बहिणीला म्हणजेच पंकजा मुंडेंना दिलं आहे. 2019 साली प्रीमत मुंढेंना 50.11 टक्के मतं मिळाली होती. तर त्यांच्याविरुद्ध लढलेल्या बजरंग सोनावणेंना 37.67 टक्के मतं मिळाली होती. 2004 चा अपवाद वगळता 1996 पासून या मतदारसंघात भाजपाची सत्ता आहे. 2004 साली राष्ट्रवादीचे जयसिंग गायकवाड-पाटील इथून निवडून आलेले. त्यामुळेच बजरंग सोनावणे पंकजा यांना तोडीूस तोड टक्कर देतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे