
महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला आणि गुजरातमधील ड्रग्ज महाराष्ट्रात आणले जात आहे. अशा पद्धतीने महाराष्ट्र खतम करण्याचं काम गुजरातची लॉबी करत आहे. तर दुसरीकडे मुंबई बॉम्बस्पह्टातील सूत्रधार इक्बाल मिर्चीशी संबंध असल्याचा आरोप भाजपने ज्यांच्यावर केले त्यांनाच आता सत्तेत घेऊन मिठय़ा मारत आहेत.
महाराष्ट्रावर आलेले हे ढोंग नष्ट करणारच, असा निर्धार शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आयोजित शिवसेना मेळाव्यात बोलताना खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी आणि राज्यातील तिघाडी सरकारचा खरपूस समाचार घेतला. ऐतिहासिक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या महात्मा फुले मैदानावर झालेला हा शिवसेनेचा मेळावा म्हणजे विराट सभाच झाली. खच्चून गर्दी, शिवसैनिकांचा उत्साह, ढोल-ताशाच्या गजरात भगवे ध्वज डौलाने फडकवत दाखल होणारे शिवसैनिक, जय शिवाजी – जय भवानी या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यामुळे भगवा झंझावात निर्माण झाला होता.
उपस्थितांच्या जल्लोषाला उद्देशून खासदार संजय राऊत म्हणाले, शिल्लक सेना काय आहे हे देवेंद्र फडणवीस तुम्ही इथे येऊन पहा. शिवसेना उसळता महासागर आणि लाट आहे. त्याला कधीच ओहोटी लागत नाही. ही जर शिल्लक सेना असेल तर तुमच्याकडे फक्त कचराच आला आहे लक्षात घ्या. फडणवीस 2024नंतर तुम्ही शिल्लक राहणार आहात का, याचा विचार करा. शिल्लक सेना सत्तेवर आम्ही आणून दाखवू. लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात एकदा वनवा पेटला तर तो विझवता येणार नाही, असा इशारादेखील राऊत यांनी दिला.
चार राज्यांतील निवडणुकांच्या निकालानंतर भाजपकडून मोदी म्हणजे गॅरंटी, असा प्रचार केला जात असल्याची खिल्ली खासदार संजय राऊत यांनी उडवली. गेली दहा वर्षे ज्या गॅरंटी लोकांना दिल्या त्याचे काय झाले ते सांगा असा खडा सवाल करून खासदार संजय राऊत म्हणाले, तुम्ही काळा पैसा देशात आणून प्रत्येकाला 15 लाख रुपये देणार होता. तसेच भ्रष्टाचार करणाऱयांना जेलमध्ये टाकण्याची गॅरंटी तुम्ही दिली होती. मग अजित पवार, हसन मुश्रीफ, राहुल शेवाळे, भावना गवळी, प्रताप सरनाईकचे काय झाले. कश्मिरी पंडित आजही निर्वासितांचे जीवन जगत आहेत आणि तिथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावले जात आहेत. याला म्हणतात हिंदुहृदयसम्राट. तुम्ही बोगस हिंदुहृदयसम्राट असून एक नंबरचे खोटारडे आणि भंपक लोक आहात, अशा शब्दात त्यांनी भाजपवर हल्ला चढवला. आज जे नरेंद्र मोदी दिसतायेत ही शिवसेनाप्रमुखांची कृपा आहे, याची आठवण करून दिली.
…त्या तर ‘व्हिलन’ताई
गद्दार गटात गेलेल्या एकेकाचा संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला. तेव्हा उपस्थित शिवसैनिक महिलांमधून गद्दारांच्या यादीत निलमताई असा आवाज आला. त्याचा उल्लेख करून संजय राऊत म्हणाले, त्या निलमताई नसून ‘व्हीलन’ताई आहेत. त्यांच्या जाण्याने पुणे पवित्र झाले आहे. शुद्ध झाले आहे, असे ते म्हणाले.
राज्यात एक फुल, दोन डाऊटफुल
राज्यात काय चालले आहे. सत्तेवर सध्या एक फुल आणि दोन डाऊटफुल आहेत. त्यांच्याविषयी कायम डाऊट आहे. सकाळी उठून मी पदावर आहे का, याची त्यांना शंका येते. एवढा डाऊट कधीच कुणावर नव्हता. संपूर्ण महाराष्ट्राची बदनामी या लोकांनी केली. घाशीराम कोतवालांचे राज्य येथे सुरू आहे.