Navgan News

महाराष्ट्र

शिंदे गटाचे ४० पदाधिकारी राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम; एकनाथ शिंदेंचा नकार


मुंबई : शिवसेना नेते व माजी मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव आणि शिवसेना सचिव सिद्धेश कदम यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामूहिक राजीनामे देण्याच्या निर्णयावर कांदिवली, चारकोप आणि मालाड येथील ४० पदाधिकारी ठाम आहेत.

बुधवारी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. मात्र, राजीनामे स्वीकारण्यास नकार दिला.

नाराज पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी चर्चेसाठी बुधवारी शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर पाचारण केले होते. नाराज पदाधिकाऱ्यांचे म्हणणे मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेतले. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुका लक्षात घेता विभाग क्रमांक २ मध्ये विभागप्रमुख हा मराठी चेहरा असावा अशी आग्रही मागणी यावेळी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. त्यावर दोन दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. कांदिवली, चारकोप आणि मालाड विधानसभा क्षेत्रात कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, याचा तपशील मुख्यमंत्र्यांना देण्यात आला. यावेळी प्रकाश सोळंकी, राजेंद्र सावंत, अँथोनी डिसोझा, राजेंद्र सिंग, प्रशांत कडू, विश्वास रेपे, महेंद्र शेडगे, राजेश यादव, नरेश बाने, सिद्धार्थ जैयस्वाल, विनोद यादव, संजय माने, सुमीत कुंभार, दिलीप भरवाड, संजय तावडे, हितेश गिरी, गोम्स डिसुझा, पुरुष पदाधिकारी तसेच रेखा पटेल, मनिषा सावंत, प्रेशिला फर्नांडिस, क्षितिजा इंगवले, गोमती शेट्टी, यामिनी भोईर आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

नाराजांनी मांडले गाऱ्हाणे
सिद्धेश कदम यांच्या मनमानी कारभाराविषयीही पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे गाऱ्हाणे मांडले. विभागात गटबाजी असून, शिष्टाचार पाळला जात नाही, पक्षाच्या कुठच्याही बैठका, मेळावे आणि पक्षाच्या बळकटीसाठी विभागात कामे होत नसल्याकडेही नाराज पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधल्याची माहिती चारकोप विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय सावंत यांनी सांगितले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *