
पुणे : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचारानंतर, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला. माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या नेतृत्त्वात शिवसैनिकांनी आज स्वारगेट बसस्थानकात घुसून, सुरक्षा रक्षकांची केबिन फोडली.
सुरक्षा रक्षकांच्या केबिनबाहेर, स्वारगेट बसस्थानक परिसरात शेकडो कंडोम पडलेत, म्हणजे इथे दररोज बलात्कार होतात, मग इथे सुरक्षा रक्षकांची केबिन कशाला आहे? असे सवाल करत, वसंत मोरे यांनी सुरक्षा रक्षकांची केबिन फोडली.
आजच्या या घटनेला जर कुणी कारणीभूत असेल तर ते सुरक्षारक्षक आहेत. या ठिकाणी 20 सुरक्षारक्षक असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे या घटनेमध्ये सुरक्षा रक्षक सामील आहेत असा आरोप वसंत मोरे यांनी केला.
या ठिकाणी सुरक्षा रक्षकांच्या संमतीने रोज बलात्कार
वसंत मोरे म्हणाले की, या ठिकाणी सुरक्षा रक्षक करतात काय? बंद असलेल्या शिवशाही एसटीमध्ये शेकडो कंडोम्स दिसतात. त्या ठिकाणी महिलांच्या साड्या, अंतर्वस्त्र, दारुच्या बाटल्या, बेडशीट सापडले आहेत. त्यामुळे सुरक्षा रक्षकांच्या संमतीने रोज हे प्रकार घडत आहेत. सुरक्षा रक्षकच या प्रकारामध्ये सामील आहेत. या बंद बस आहेत त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांच्या कार्यालयासमोरूनच जावं लागतं. तरीही अशा घटना कशा घडतात?
स्वारगेट आगारप्रमुख, परिवहन मंत्री काय करतात?
सुरक्षा रक्षकांची एवढी संख्या असताना, चहूबाजूने बंदिस्त असताना या घटना कशा घडतात? असा प्रश्न वसंत मोरे यांनी विचारला आहे. या घटनेची माहिती आगारप्रमुखाला माहिती नाही म्हटल्यावर काय म्हणायचे? आगारप्रमुख आणि या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकांवर कारवाई झाली पाहिजे. नाहीतर आम्ही कायदा हातात घेऊ असा इशारा वसंत मोरे यांनी दिला.
बसमध्येच साड्या, कंडोम्स सापडले
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकाच्या परिसरात पार्क केलेल्या आणि जुन्या बसेस मध्ये साडी, शर्ट, बेडशीट आणि कंडोम्स साडपले आहेत. त्यावरून रात्रीच्या वेळी या बसमध्ये काय प्रकार घडत असतील याचा अंदाज येतो. त्यामुळे महिला प्रवाशांसाठी बसस्थानक सुरक्षित नसल्याचं स्पष्ट होत आहे.
स्वारगेटमधील बसमध्येच बलात्कार
सगळ्या राज्याला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना पुण्यात घडली असून स्वारगेट बस स्थानकात मंगळवारी पहाटे एका तरुणीवर बलात्कार करण्यात आला. एसटी स्टँड परिसरात पार्क केलेल्या एसटी बसमध्ये ही धक्कादायक घटना घडली. सीसीटीव्हीवरून या गुन्ह्यातल्या आरोपीची ओळख पटली असून त्याचं नाव दत्तात्रय गाडे असं आहे.दत्तात्रय गाडे सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर याआधीही अनेक गुन्हे दाखल आहेत.