ताज्या बातम्या

बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरण रचून त्यावरती बसून सरण आंदोलन कशासाठी ?


बीड : जिल्ह्यातील अनेक स्मशानभूमीची दुरवस्था झालेली आहे. प्रशासनाकडे अनेकदा तक्रार करूनही याची दखल घेतली जात नाही. या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी काल (शनिवारी) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरण रचून त्यावरती बसून सरण आंदोलन केले.
जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या स्मशानभूमी दुरुस्त कराव्यात, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. जिल्ह्यातील 1394 गावांपैकी 656 लहान-मोठ्या गावात स्मशानभूमीची सोय नसल्यामुळे पावसाळ्यात अंत्यसंस्काराच्या वेळी मृतदेहाची हेळसांड होत असते. स्मशानभूमीची सुद्धा दुरावस्था झाली असून अंत्यसंस्कार दरम्यान काही गावांतील ग्रामस्थांमध्ये वादविवाद होऊन सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाला वारंवार निवेदने देऊन आंदोलने सुद्धा करण्यात आली. आता एका सामाजिक कार्यकर्त्याने सरण रचून आंदोलन केले. हे आंदोलन 12 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले. स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रधान सचिव, ग्रामविकास मंत्री, पालकमंत्री यांना निवेदन दिले होते; पण त्यावर काही कारवाई झाली नाही.

स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी आंदोलने; पण..: बीड जिल्ह्यातील अस्तित्वात असलेल्या स्मशानभूमीची दुरावस्था झाली असून शेडचे पत्रे उडून गेले आहेत. बांधकाम पडलेले, अतिक्रमणामुळे रस्त्याची सोय नाही. आदी कारणांमुळे ग्रामस्थांमध्ये वादाचे प्रसंग घडून मृतदेह तहसील कार्यालयात आणण्याच्या दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत. वरील प्रकरणात डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली 11 नोव्हेंबर 2022 रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डॉ. ज्ञानेश्वर मोकाटे यांनी जिल्ह्यात स्मशानभूमी बांधकामाची आवश्यकता असल्याचे सांगत आंदोलन केले होते.

दुरुस्तीचा प्रस्ताव सादर, काम मात्र शून्य: बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी गटविकास अधिकारी यांच्या मार्फत जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाला स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना दिल्या होत्या; मात्र या घटनेला काही महिने उलटून सुद्धा अद्याप बांधकाम अथवा दुरूस्तीचे कामच सुरू झालेले नाही.

स्मशानभूमी दुरुस्त करावी: ज्या स्मशानभूमीमध्ये मृत व्यक्तीचा दफनविधी करायचा आहे, अशा ठिकाणी ती जागा व्यवस्थित नसल्याने त्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागतो असे सामाजिक कार्यकर्ता गणेश ढवळे यांचे म्हणणे आहे. जी स्मशानभूमी आपण पाहत आहोत त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. लवकरात लवकर ही स्मशानभूमी दुरुस्त करावी, अशीच मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील स्मशानभूमींची दुरावस्था झालेली आहे. तेथील नागरिकांना पावसाळ्यात प्रचंड त्रास सहन करावा लागतो. मात्र, प्रशासन याकडे दुर्लक्ष करते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *