
काही दिवसांपासून एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या गुन्ह्यात वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलांमध्ये याचे अधिक प्रमाण आहे.
औरंगाबाद : औरंगाबादच्या वाळूज महानगरात एका तरुणाने ‘तू माझी नाही तर कोणाचीच नाहीस, मी मरेन आणि तुलाही मारीन, अशी धमकी देऊन एका 17 वर्षीय मुलीची छेड काढत विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे याप्रकरणी तरुणाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, शिवा साळुंके (गट क्रमांक 7 वडगाव कोल्हाटी, वाळूज औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूज महानगरात कुटुंबासह राहणारी एक अल्पवयीन मुलगी ही परिसरातील एका महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत आहे. दरम्यान 24 नोव्हेंबर रोजी पीडित मुलगी घराजवळ असताना असताना रात्री 9 वाजच्या सुमारास तिच्या ओळखीचा शिवा साळुंके हा तिच्याजवळ आला. तसेच तू माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये ये म्हणत, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलीने त्याला नकार देताच, शिवाने तिचा हात पकडून तू माझी नाहीस तर कोणाची नाही असे म्हणत तिचा विनयभंग केला. यावेळी मुलीने आरडाओरड सुरू केल्याने मुलीच्या घरातील लोक बाहेर आले. त्यांना पाहून शिवाने तेथून पळ काढला.
पुन्हा मुलीला अडवलं…
दरम्यान या घटनेनंतर परत दुसऱ्या दिवशी 25 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास मुलगी ही कॉलेजमध्ये निघाली. कॉलेजमध्ये जात असताना पाठीमागून आलेल्या शिवाने तिला रस्त्यात गाठत अडवले. तसेच आज मी मरणार असून, तुलाही मारणार असल्याची धमकी देऊन तो तेथून निघून गेला. त्यामुळे घाबरलेल्या मुलीनी आई-वडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर या प्रकरणी मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी शिवा साळुंके याच्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.